नोटाबंदीनंतर मोठे व्यवहार करणारे 60 हजार खातेधारक रडारवर

0

नवी दिल्ली। आयकर विभागाकडून 60 हजार लोकांची चौकशी ऑपरेशन क्लिन मनीच्या दुसर्‍या टप्प्यात करण्यात येणार आहे. आयकर विभागाकडून नोटाबंदीनंतर काळा पैसा उजेडात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. 9 नोव्हेंबर 2016 ते 28 फेब्रुवारी 2017 या कालावधीत 9 हजार 334 कोटींचा काळा पैसा उघड केल्याची माहिती आयकर विभागाच्या धोरणात्मक कामकाजाची जबाबदारी असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने दिली आहे. या कारवाईचा आता दुसरा टप्पा सुरु झाला आहे. यामध्ये तब्बल 60 हजार लोकांची चौकशी आयकर विभागाकडून केली जाणार आहे.

नोटिसांना प्रतिसाद न देणारांची होणार चौकशी
नोटाबंदीनंतरच्या दरम्यान मोठ्या रकमेचे व्यवहार करणार्‍या, अधिक रकमेच्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणार्‍यांची एक यादीच तयार करण्यात आली आहे. 6 हजारांहून अधिक मोठ्या रकमेच्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणार्‍यांचा आकडा आहे. तर अधिक रक्कम पाठवली गेल्याची 6,600 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या प्रकरणी एकूण 60 हजार लोक रडारवर आहेत. या लोकांची ऑपरेशन क्लिन मनीच्या दुसर्‍या टप्प्यात चौकशी केली जाणार असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने म्हटले आहे. यासोबतच पहिल्या टप्प्यात प्रतिसाद न दिलेल्या अनेकांची दुसर्‍या टप्प्यात कसून चौकशी करण्यात येणार असल्याचेही केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय, देशातून बाहेर पैसा पाठविण्याच्या 6,600 घटना आढळल्या आहेत.

मोठ्या व्यवहाराची तपासणी
बँक खात्यांचा तपशील ऑपरेशन क्लिन मनीच्या दुसर्‍या टप्प्यातील कारवाईआधी तपासण्यात आला आहे. आता आयकर विभागाच्या रडारवर नोटाबंदीनंतर मोठ्या रकमेचे व्यवहार करणारे, अधिक रकमेच्या उलाढाली करणारे आहेत. ऑपरेशन क्लिन मनीच्या दुसर्‍या टप्प्यात नोटाबंदीनंतर मोठ्या रकमेचे व्यवहार करणारे लोक आयकर विभागाच्या निशाण्यावर असणार आहेत. या लोकांची चौकशी आयकरकडून करण्यात येणार आहे.