नोटाबंदीने काय साधले?

0

नोटाबंदीच्या नकारात्मक परिणामामुळे भारताचा विकासदर 7.1 टक्क्यांपर्यंत खाली आला. तसा अहवाल केंद्र सरकारच्याच सांख्यिकी विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आला आहे. 2015-16 या अर्थवर्षात विकासदर 7.9 टक्के इतका होता. म्हणजेच हा विकासदर 0.7 टक्के इतका घसरला आहे. जवळपास एका टक्क्याने अशी घसरण होणे ही निश्‍चितच काळजी करण्यासारखी बाब म्हणावी लागेल. नोटाबंदी म्हणजे सर्वसामान्य नागरिकांची संघटित लूट आणि कायदेशीर लुबाडणूक असल्याचे खडेबोल या दुर्दैवी निर्णयानंतर माजी पंतप्रधान तथा जागतिक पातळीवरचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी सुनावले होते. नोटाबंदीच्या निर्णयामुळे कृषिविकास, लघुउद्योग तसेच असंघटित क्षेत्रातील घटक बाधित होतील, अशी भीती व्यक्त करताना त्यांनी आर्थिक विकासदर दोन टक्क्यांनी घसरणार असल्याचा भयसूचक इशाराही दिला होता. अत्यंत दुर्दैवाने हा इशारा आता खरा ठरू लागला आहे.

2015-16 या अर्थवर्षात 7.9 टक्केअसलेला देशाचा आर्थिक विकासदर जवळपास एका टक्क्याच्या घरात घसरत असेल तर सरकारी धोरणे चुकली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा नोटाबंदीचा निर्णय फसला आहे. त्याचे दुष्पपरिणाम देशाला पुढील कित्येक दशके भोगावे लागणार आहेत. कारण हा निर्णय चुकीच्या वेळी आणि चुकीच्या गृहितकांवर घेतला गेला होता. मोदींच्या या निर्णयाचे परिणाम अर्थव्यवस्थेवरच नाही तर रोजगार क्षेत्रावरदेखील उमटले आहेत. मोठ्या प्रमाणात नोकर्‍या जात असून, देशातील पाच उद्योग क्षेत्र सध्या कमालीचे अडचणीत आहेत. त्यात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राचा अव्वल क्रमांक लागतो. पुण्यातील आयटी क्षेत्रात तर कमालीची तणावग्रस्तता आहे. यावर्षाअखेर एक लाख आणि या महिन्याअखेर 10 हजार जणांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. इतर उद्योगांतही हीच परिस्थिती आहे. या बेरोजगारीला मोदी आणि त्यांचा हा अडेलतट्टू निर्णयच कारणीभूत म्हणावा लागेल. खरे तर यापूर्वीच जानेवारी-मार्च या शेवटच्या तिमाहीत नोटाबंदीच्या नकारात्मक परिणामांची जाणीव होण्यास सुरुवात झाली होती. त्याचमुळे भारताचा आर्थिक विकासदर 6.1 टक्क्यांवर सीमित झाला होता.

गेल्यावर्षी चांगल्या पावसाने साथ दिली नसती, तर विकासदर आणखी घसरला असता. पावसामुळे कृषिक्षेत्रात चांगली वाढ दिसून आली आणि अर्थव्यवस्थेला थोडा दिलासा मिळाला. परंतु, आता नोटाबंदीच्या दुष्परिणामांची जाणीव होऊ लागली असून, देशावर नवे अरिष्ट घोंगावू लागल्याचे सर्वांनाच जाणवत आहे. कृषिक्षेत्र वगळता सर्वच क्षेत्रांमध्ये मोठी घसरण सुरू झाली. सर्वाधिक फटका बांधकाम क्षेत्राला बसला. या क्षेत्रात सध्याही मोठी मंदी कायम असून, त्यामुळे अर्थव्यवस्था पांगळी झाल्याचे दिसते. तूर्ततरी एकट्या कृषिक्षेत्राच्या वाढीकडे पाहून चालणारे नाही. सेवा, उद्योग, उत्पादन या क्षेत्राच्या आर्थिक वाटचालीकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. आता या क्षेत्राच्या वाटचालीबाबत जे काही दिसते ते खचितच दिलासादायक नाही. उलटपक्षी प्रत्येकाच्याच हृदयाचे ठोके वाढवणारी ती बाब आहे. नोटाबंदीच्या उद्देशाविषयी कोणाचेच दुमत नव्हते. परंतु, त्याची अंमलबजावणीही व्यवस्थापनाचे घोर अपयश होती. अल्पावधीसाठी झालेल्या त्रासापेक्षा आता जेव्हा दीर्घकाळासाठी या निर्णयाचे दुष्पपरिणाम दिसून येतात, तेव्हा मात्र ती संपूर्ण देशासाठी अतिशय चिंतेची बाब ठरते आहे.

आज रोजी या देशात कुणीही समाधानी नाही, सुखी नाही की सुखाचे दोन खास खाण्याच्या मानसिकतेत नाही. आज जेव्हा हा अग्रलेख आम्ही लिहिण्यासाठी घेतला तेव्हा महाराष्ट्रातील तमाम शेतकरीवर्ग संपावर गेलेला आहे. शेतकर्‍यांनी संप पुकारण्याची वेळ यावी, यामागे सरकारचे अपयश असून, हे अपयश नोटाबंदीच्या दुर्दैवी निर्णयातून आले आहे. आज शेतमालास भाव नाही, शेती पिकवण्यासाठी पैसा नाही, भाजपचेच असलेले राज्य सरकार कर्जमाफी देण्यास तयार नाही. डोक्यावर असलेल्या कर्जामुळे गळफास घेण्याची वेळ शेतकर्‍यांवर आलेली आहे. अब्जावधी रुपयांच्या नोटा जिल्हा सहकारी बँकांत पडून आहेत. परंतु, त्याचे काय करायचे? याबाबत सरकारचा अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे शेतीकर्जाचा पुरवठा ठप्प पडलेला आहे. एक ना अनेक समस्या निर्माण झालेल्या असून, त्या सर्व समस्यांचे मूळ हे नोटाबंदीच्या निर्णयाशी येऊन मिळते. अत्यंत अविचाराने घेतलेल्या या निर्णयामुळे भविष्यातही काय भोगावे लागेल, ते तूर्त तरी सांगणे कठीण असले तरी देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली असून, त्याचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत. देशाचा आर्थिक विकासदर घसरला आणि पुढेही तो असाच घसरत जाणार हे अर्थतज्ज्ञांचे संकेत धोक्याची घंटाच म्हणावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितीही बोलबच्चनगिरी केली, तरी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग काय म्हणाले होते त्याची आता पदोपदी देशवासीयांना आठवण येणार आहे? नोटाबंदीचे चांगले परिणाम कधीही दिसू शकणार नाही, कारण ती एक भूलथाप होती, संघटित लूट होती! हेच खरे आहे.