नवी दिल्ली : शुक्रवारी मध्यरात्रीपासून देशभरात जीएसटी लागू होत असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला. जीएसटीत आणखी बरेच काही करता येण्यासारखे आहे; मात्र आपला प्रचार करण्यासाठीच अर्धवट स्वरूपात घाईघाईत जीएसटी लागू करण्याचा घाट घातला जात आहे. नोटांबदीप्रमाणेच कोणत्याही पूर्वतयारीशिवाय एका अकार्यक्षम आणि असंवेदनशील सरकारकडून जीएसटी प्रणाली लागू केली जात आहे, असा आरोप राहुल यांनी केला. संसद भवनातील ऐतिहासिक मध्यवर्ती सभागृहात मध्यरात्री विशेष बैठकीत जीएसटी पर्वाचा आरंभ केला गेला. या बैठकीवर काँग्रेसने बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला असतानाच, पक्षाचे उपाध्यक्ष राहुल यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही सरकारला लक्ष्य केले आहे. कोट्यवधी देशवासीय, छोटे दुकानदार आणि व्यापारी या सगळ्यांचे हित जपणारी जीएसटी प्रणाली भारतात आणण्याची गरज आहे, अशा शब्दांत त्यांनी विद्यमान जीएसटीवर टीका केली.
मोदींनीच केली होती जीएसटीवर टीका
नोटाबंदीच्या निर्णयासारखेच जीएसटीच्या बाबतीत झाले आहे. कोणताही दूरदृष्टीकोन न ठेवता देशभरात जीएसटीची अंमलबजावणी केली जात आहे. जीएसटीमध्ये सुधारणांच्या अनेक संधी आहेत. पण तरीही भाजप सरकारकडून त्याची घाईघाईने अंमलबजावणी करण्यात येत आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, याआधी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना जीएसटीवर केलेल्या भाषणाचा व्हिडिओ ट्विटरवर अपलोड करून भाजपवर निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदी यांचा जीएसटीला विरोध होता, हे त्यातून सांगण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला होता. जीएसटीची अंमलबजावणी करणे शक्य नाही. ते स्वप्न प्रत्यक्षात उतरणे अशक्य असल्याचे मोदी त्यावेळी म्हणाले होते. करदात्यांसह माहिती-तंत्रज्ञानाचे जाळे जोपर्यंत पूर्णपणे तयार होत नाही, तोपर्यंत जीएसटीची अंमलबजावणी अशक्य आहे, असे मत मोदींनी मांडले होते. त्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करून मोदी खूप लवकर आपलेच शब्द कसे विसरतात, असा टोला काँग्रेसने मोदींना लगावला होता. जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा न करता, जीएसटीची अंमलबजावणी का केली जात आहे, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला होता.