नोटाबंदीमुळे करसंकलनात वाढ

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रत्यक्ष करांच्या संकलनात मोठी वाढ झाल्याची माहिती देत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गुरुवारी नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले. तसेच, रिझर्व्ह बँकेकडे आता पाचशेच्या नोट्या मोठ्या संख्येने उपलब्ध होत असल्याने नागरिकांनाही त्या लवकरच मिळू शकतील, असेही जेटली यांनी सांगितले. नोटाबंदीच्या निर्णयाला शुक्रवारी 50 दिवस पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने येथे पत्रकार परिषदेत बोलताना जेटली यांनी ही माहिती दिली.

चलनातील मोठा हिस्सा बदलून झाला
काँग्रेसच्या टीकेला उत्तर देताना अर्थमंत्री म्हणाले, की रिझर्व्ह बँकेकडे पुरेशा प्रमाणात नोटा उपलब्ध आहेत. चलनातील मोठा हिस्सा आता बदलून झाला असून, 500 च्या नोटा मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेत पाठविण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर 19 डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष करसंकलनात 14.40 टक्के, अप्रत्यक्ष करसंकलनात 26.20 टक्क्यांनी वाढ झाली असून, देशाचा महसूल वाढला आहे. केंद्रीय उत्पादन शुल्कातही 43.30 तर सीमा शुल्क वसुलीत 6 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचेही जेटली यांनी स्पष्ट केले. या निर्णयास पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी नागरिकांचे आभारही मानले.

मोदी काय बोलणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजे शनिवारी देशाला संबोधित करणार आहेत. 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर करतानाच त्यांनी देशवासीयांना 50 दिवस साथ देण्याचे आवाहन केले होते. तसेच, वर्षाअखेरीस आपण आणखी एक धक्का देणारा निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पंतप्रधान कोणता नवा निर्णय जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधानांनी 8 नोव्हेंबरला अचानक नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानंतर देशात खळबळ उडाली होती. आपल्याकडील जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी बँकांपुढे नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.