शिक्रापूर । सध्या शेतकर्यांचे प्रचंड हाल चालले असून जीएसटीमुळे सामान्य व्यापार्यांचे कंबरडे मोडले असून नोटाबंदीच्या काळामध्ये मोठमोठ्यांनी हात धुऊन घेतले. नोटाबंदीनंतर किती नोटा नकली आल्या याची देखील आकडेवारी अद्याप कळली नाही, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे धर्मवीर संभाजी बँकेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी पवार बोलत होते. याप्रसंगी प्रदीप कंद, मंगलदास बांदल, कुसुम मांढरे, सविता बगाटे, मानसिंग पाचुंदकर, रवींद्र काळे, सुभाष उमाप, सरपंच जयश्री भुजबळ,उपसरपंच आबाराजे मांढरे, आबासाहेब करंजे, अरुण करंजे, बाबासाहेब सासवडे, गौरव करंजे, कुंदा सोंडे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, सध्याच्या सरकारने नोटाबंदी करून नागरिकांचे प्रचंड हाल चालवले आहेत नोटाबंदी करून भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढला आहे. सध्या सरकार बुलेट ट्रेनच्या मागे लागले आहे. पण भारतात आहे त्या ट्रेनला वेळेवर सिग्नल मिळत नाही आणि सरकार बुलेट ट्रेन सुरू करायला निघाले. कायदा व सुव्यवस्था बिकट झालेली आहे. सरकारचे जर असेच चालू राहिले तर येत्या काळात शेतकर्यांच्या आंदोलनात सर्व शेतकर्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.शरद पवार गेल्या वर्षभरापूर्वी शिक्रापूर येथे कार्यक्रमानिमित्त आले असताना शिक्रापूरचे माजी सरपंच व ज्येष्ठ नेते आबासाहेब करंजे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती, तर यावेळी अजित पवार यांनी शिक्रापूरचे उपसरपंच आबाराजे मांढरे यांच्या निवासस्थानी भेट दिल्याची चर्चा यावेळी रंगली होती.