नवी दिल्ली : केंद्र सरकारचा नोटाबंदीचा निर्णय स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारी पुन्हा एकदा केला. हा घोटाळा उघड करण्यासाठी काँग्रेसतर्फे देशभरात रविवारपासून मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. आता पुन्हा एकदा काँग्रेसने केंद्र आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेस तीन टप्प्यांत मोहीम राबवणार आहे. 1 ते 10 जानेवारी या काळात पहिला, तर 11 ते 20 जानेवारीदरम्यान दुसर्या टप्प्यात देशभरात नोटाबंदीला विरोध केला जाणार आहे. 21 ते 30 जानेवारी हा तिसरा टप्पा असेल, अशी माहिती सुरजेवाला यांनी दिली.