नवी मुंबई । रायगड जिल्हा काँग्रेस तसेच पनवेल तालुका व शहर काँग्रेस व युवक, महिला, सेवादल, अल्पसंख्याक विभाग व सर्व सेलच्या वतीने बुधवारी पनवेल काँग्रेस भवन ते अश्वारूढ शिवाजी पुतळापर्यंत नोटाबंदी विरुद्धा मोर्चा काढून काळा दिवस पाळण्यात आला. ह्या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी हाताला काळ्या फिती बांधून नरेंद्र मोदी सरकारच्या नोटाबंदी सारख्या तुघलकी फरमानचा जाहीर निषेध केला. या वेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अॅड. के. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केला तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस निर्मला म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्षा श्रुती म्हात्रे यांनी सरकारचे निषेध केला.
नोटाबंदीचा निर्णय चुकीचा
राष्ट्रीय इंटक सचिव महेंद्र घरत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवून नोटाबंदी हा निर्णय चुकीचा आहे असे सांगितले तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव श्याम म्हात्रे यांनी मनोगत व्यक्त केले व सरकारचा निषेध केला. रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर. सी. घरत यांनी या सरकारच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाले असून, या नोटबंदीमुळे गोर गरीब जनतेने जीव गमावला असून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यास सांगितले तसेच या निर्णयाने अनेक व्यापारी, छोटे व्यावसायिक, नोकरदार यांना नाहक त्रास या भाजप सरकारने दिले असे स्पष्ट केले.