नवी दिल्ली । मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. आता कॉर्पोरेट जगतातूनही नोटाबंदीच्या विरोधात सूर उमटू लागला आहे. मोदी सरकारची नोटाबंदी करण्याची कल्पनाच चुकीची होती. त्यामुळे त्याच्या अंमलबजावणी प्रक्रियेबाबत आक्शेप घेण्याला काहीच अर्थ नसल्याचे, बजाज ऑटो कंपनीचे महाव्यवस्थापक राजीव बजाज यांनी नॅसकॉमच्या वार्षिक लीडरशिप फोरममध्ये बोलताना सांगितले.
नोटाबंदीच्या विरोधात बोलणार्या कॉर्पोरेट जगातील काही उद्योजकांपैकी राजीव बजाज एक आहेत. बजाज म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदी घोषित केल्यावर भारतीय अर्थव्यवस्थेतील सुमारे 15.44 लाख कोटी रुपयांपैकी 86 टक्के रक्कम बाहेर गेली आहे. बजाज, यामहा, होंडा या दुचाकी कंपन्यांना कच्च्या मालाचा पुरवठा करणार्या छोट्या उद्योगातील सुमारे 3 हजार लोकांना नोकर्या गमवाव्या लागल्या आहेत.नोटाबंदीमुळे बसलेल्या फटक्यातून दुचाकी उद्योग अजून सावरलेला नाही.
मेक इन नव्हे, मॅड इन इंडिया
शासकीय मंजूर्या आणि नियामक संस्थामुळे मेक इन इंडियाचे मॅड इन इंडिया झाल्याची टीका राजीव बजाज यांनी केली. चार वर्षांनंतरही बजाज ऑटोला चारचाकी वाहन निर्मितीची परवानगी मिळाली नसल्याचे बजाज म्हणाले. चांगला मान्सून आणि बदलणार्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमुळे दुचाकींची विक्री आगामी काळात वाढेल, असा अंदाज बजाज वर्तवला. नोटाबंदीनंतर बजाज ऑटोच्या दुचाकी विक्रीमध्ये 16 टक्क्यांनी घसरण झाली.