रघुराम राजन यांचे प्रखड मत
नवी दिल्ली : नोटाबंदी यशस्वी झाली असे ठामपणे कुणीही म्हणू शकत नाही. नोटाबंदीच्या निर्णयामागील सरकारचा उद्देश चांगला होता. मात्र, त्याची मोठी किंमत मोजावी लागली, असे परखड मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या इशार्यानंतरही नोटबंदी करण्यात आली. नोटाबंदीमुळे होणार्या दीर्घकालीन फायद्यापेक्षा नजीकच्या काळात होणारे नुकसान मोठे असेल, असा इशारा सरकारला देण्यात आला होता, असा खुलासाही राजन यांनी केला. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या विशेष मुलाखतीत राजन यांनी आपली मते व्यक्त केली.
सावध करुनही सरकारने ऐकले नाही!
पुढील आठवड्यात रघुराम राजन यांचे एक पुस्तक प्रकाशित होत आहे. या पुस्तकात राजन यांनी आर्थिक विषयावर मते व्यक्त केली आहेत. नोटाबंदीमुळं होणार्या दीर्घकालीन फायद्यापेक्षा नजिकच्या काळात होणारे नुकसान मोठे असेल असे मी सरकारला सांगितले होते. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी अन्य पर्यायही त्यावेळी सरकारला सुचवले होते, असे राजन यांनी सांगितले. फेब्रुवारी 2016मध्ये मी सरकारला नोटाबंदी न करण्याचा तोंडी सल्ला दिला होता. तरीही सरकारने नोटाबंदी केलीच तर ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलावी लागतील, त्यासाठी किती वेळ लागेल, याबद्दल आरबीआयने सरकारला एक सविस्तर टिपणही पाठवले होते. पुरेशी तयारी नसेल तर काय दुष्परिणाम होऊ शकतात याबद्दलही सरकारला सावध केले होते, असे राजन म्हणाले. राजन यांचा कार्यकाळ 5 सप्टेंबर 2016 साली पूर्ण झाला होता. तर, नोटाबंदीचा निर्णय 8 नोव्हेंबर 2016 रोजी घेण्यात आला होता. रिझर्व्ह बँकेने नोटाबंदी संदर्भातील बँकेच्या वार्षिक अहवालात आकडेवारी जाहीर केली. यामध्ये बंद करण्यात आलेल्या नोटांपैकी सुमारे 99 टक्के नोटा नागरिकांनी बँकांत जमा केल्याचे म्हटले आहे. केवळ 1 टक्का नोटा जमा झालेल्या नाहीत, असे या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.