पुणे । नोटाबंदी वर्षपूर्ती निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघाले असून भाजपने समर्थनासाठी मिरवणुका आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विरोधात मोर्चे काढण्याचे ठरविले आहे.
माझे नोटाबंदीला समर्थन आहे, भ्रष्टाचारविरोधी लढ्यात मी सहभागी आहे, अशा आशयाच्या निवेदनावर नागरिकांच्या सह्या घेण्याची मोहीम भाजपने आखली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय ही मोहीम राबविली जाईल. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे पुण्यातील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यांची आणि खासदार अनिल शिरोळे यांच्या स्वतंत्र पत्रकार परिषदा होणार आहेत. नोटाबंदी निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्यावतीने आज (बुधवारी) सकाळी साडेदहा वाजता महात्मा फुले मंडईपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, दिलीप वळसे पाटील सहभागी होणार आहेत. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी पक्षाने सारी ताकद लावली आहे. काँग्रेस पक्षानेही मोर्चा काढण्याचे ठरविले असून सकाळी साडेदहा वाजता स.प. महाविद्यालयापासून अभिनव महाविद्यालयपर्यंत मोर्चा आणि संध्याकाळी लष्कर भागात मेणबत्ती मोर्चा आयोजित केला आहे. काँग्रेसच्या मोर्चात सर्व स्थानिक नेते असतील.याखेरीज हमारी अपनी पार्टीच्या वतीने नोटा बंदी निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभराचे धरणे धरण्यात येणार आहे. कष्टकरी संघटनांच्यावतीने बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे.