नोटाबंदी विरोधात काँग्रेसचे आंदोलन

0

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदींच्या निर्णया विरोधात जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे रॅलीचे आयोजन शुक्रवार 6 जानेवारीला करण्यात आले होते. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर येवून धडकली असता जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार पोलीसांद्वारे बंद करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होवून घोषणा बाजी करण्यास सुरूवात केली. आंदोलनकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार नारेबाजी केली. दुपारी दोन वाजता रॅलीची सुरूवात कोर्ट चौकातून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जळगाव जिल्हा प्रभारी मनोज राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

जिल्हाधिकारी दालनासमोर केले बैठे आंदोलन
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, डॉ.ए.जी. भंगाळे, डॉ. उल्हास पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, प्रभाकर सोनवणे, अजबराव पाटील, शाम तायडे, अमजदखान पठाण, उल्हास साबळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकार्‍यांनी कॉग्रेसतर्फे निवेदन देण्यात येणार होते. परंतु, जिल्हाधिकारी ह्या त्यांच्या दालनात नसल्याने त्यांच्या दालनासमोर देखील धरणे आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत जिल्हाधिकारी आमचे निवेदन स्वीकारणार नाही तोपर्यंत बैठे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर बैठे आंदोलन करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांनी केली असता
डीवायएसपी सचिन सांगळे यांनी आंदोलकांना बैठे आंदोलन करण्यास मज्जाव केला. सांगळे यांनी काँग्रेसी नेत्यांना तुम्ही लोकशाही मार्गांने आंदोलन करण्याचा शब्द दिला होता तो दिलेला शब्द पाळत नसल्याने नाराजी व्यक्त करीत कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोरून उठण्यास सांगितले. जिल्हाधिकारी उपलब्ध नसल्याने निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना निवेदन देण्यात आले.
नेत्यांना जिल्हाधिकारी कार्यालयच्या आत सोडत नसल्याचे पाहून कार्यकर्तं संतप्त झाले होते. कार्यकर्त्यांनी स्वातंत्र चौकातून आकाशवाणी चौकात जाणार्‍या गाड्यांसमोर झोपून रस्ता रोको केला असता. पोलीसांनी त्यांना आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले.