नोटा काढण्यावरील मर्यादा 30 डिसेंबरनंतरही सुरुच राहील!

0

मुंबई/पुणे (विशेष प्रतिनिधी) : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये युद्धपातळीवर नोटाछपाई सुरु असली तरी, देशवासीयांना आवश्यक असलेल्या नोटा छापण्यात अद्याप तरी यश आले नाही. त्यामुळे 30 डिसेंबरनंतरही एटीएम व बँकांद्वारे पैसे काढण्यावरील निर्बंध कायम राहू शकतील, असे संकेत विविध बँकेच्या अधिकार्‍यांनी दिले आहेत. देशभर सद्या चलन तुटवडा जाणवत असून, अद्यापही एटीएम बाहेर भल्यामोठ्या रांगा कायम आहेत. तसेच, बँकांतही नागरिकांच्या रांगा जैसे थे आहेत.

चलनात पुरेशा नोटाच नाहीत!
देशातील चलनकल्लोळ संपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 दिवसांचा अवधी मागितला होता. हजार आणि 500 रुपयांच्या नोटा एका झटक्यात बंद करण्यात आल्यानंतर निर्माण झालेला हा चलनकल्लोळ अद्यापही कायम आहे. त्यामुळे नोटांची कमी असलेली संख्या व मोठी मागणी पाहाता, रिझर्व्ह बँकेने रोख काढण्यावर निर्बंध लादलेले आहेत. सद्या टाकसाळीत युद्धपातळीवर नोटांची छपाई सुरु आहे. तरीही गरजेपुरत्या नोटा छापल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे नवीन वर्षातही नोटा काढण्यावरील निर्बंध कायम राहणार असल्याचे बँकांचे सूत्र म्हणाले. सद्या आठवड्याकाठी 24 हजार रुपये काढण्याची मुभा आहे. प्रत्यक्षात एटीएममधून एकावेळी केवळ दोन हजार रुपयेच निघत आहेत. त्यामुळे रोखटंचाई निर्माण झाल्याने अर्थव्यवहार अडचणीत आलेले आहेत. 2 जानेवारी हा आठवडा सुरु होण्याचा पहिला दिवस राहणार आहे. तोपर्यंत तरी पुरेशा नोटा चलनात येण्याची काहीही शक्यता नाही, असेही सूत्राने स्पष्ट केले.

अर्थव्यवस्थेचे गाडे अद्यापही रूतलेलेच..
एसबीआयच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनीही सांगितले, की लोकांना हव्या तेवढ्या नोटा देण्याची तूर्त तरी क्षमता बँकांकडे नाही. कारण, पुरेशा प्रमाणात बँकांकडे नवे चलन आलेले नाही. त्यामुळे आरबीआयने रोख काढण्यासाठी घालून दिलेली मर्यादा तूर्त तरी हटणे अशक्य असून, ती कधी पूर्णतः हटविली जाईल, हे सांगणेही अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सद्या कार्पोरेट कंपन्या आणि इतर व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणात चलन लागत आहे. तथापि, त्यांना हे चलन उपलब्ध करून दिल्या जात नसून, ते बँकांमार्फत सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यावर सरकारने भर दिलेला आहे. त्यामुळे अर्थव्यवहाराचे गाडे सद्या रुतलेल्या अवस्थेत आहे, असेही बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सचिव अशोक लवासा यांनी 30 डिसेंबरनंतर नोटा काढण्याची मर्यादा हटविली जाईल, असे सांगितले होते. परंतु, तशी कोणतीही स्थिती नसल्याचेही सूत्राने स्पष्ट केले.

फार मोठा काळा पैसा असण्याची शक्यता मावळली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर आरबीआयने हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांच्या स्वरुपातील 15.40 लाख कोटींचे चलन रद्द केले होते. त्यानंतर 9 नोव्हेंबरपासून ते आता 19 डिसेंबरपर्यंत 5.92 लाख कोटी रुपयांचे चलन अर्थव्यवस्थेत येऊ शकलेले आहे. पूर्णक्षमतेने चलन अर्थव्यवस्थेत येण्यासाठी नेमका किती काळ लागेल, हे सांगणे सद्या अर्थमंत्रालय किंवा आरबीआयलादेखील अशक्य आहे. त्यामुळे 2 जानेवारीनंतरही नोटा काढण्याची मर्यादा हटविणे आरबीआय आणि सरकारसाठी केवळ अशक्य बाब असल्याची माहितीही बँकिंगच्या वरिष्ठ अधिकारी सूत्राने दिली. नोटाबंदीनंतर जुन्या नोटांच्या स्वरुपातील 12.40 लाख कोटी रुपयांचे चलन बँकांत जमा करण्यात आले असून, ही आकडेवारी 10 डिसेंबरपर्यंतचही होती. त्यानुसार, 30 डिसेंबरपर्यंत बहुतांश प्रमाणात जुने चलन बँकांत जमा होईल, असेही सूत्र म्हणाले. त्यामुळे काळा पैशाच्या मुद्द्यावर मोदी सरकार तोंडघशी पडण्याचीही शक्यता अधिक आहे.