जळगाव। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चोपडा शाखेतून नोटबंदीच्या काळात सुटी असतानांही 73 लाख रुपयाच्या जुन्या नोटा बदलून देण्यात आल्या. जळगाव जिल्हा बँकेतील या नोटबदलीच्या प्रकरणाची तक्रार मुंबई क्राइम ब्रँचमध्ये करण्यात आली. या तक्रारीच्या आधारावर काही दिवस गोपनीय चौकशी करून नोटबदलीच्या तब्बल चार महिन्यांनंतर म्हणजे मार्चला अचानक सीबीआयचे पथक जळगावात आले आणि त्यांनी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्यासह चोपडा शाखेतील दोघा कर्मचार्यांची चौकशी केली. नोटा बदलीचे धागेदोरे जिल्हा परिषदेपर्यत पोहोचले असल्याचे सध्या दिसत आहे. नोटाबदली प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जिल्हा परिषदेत येऊन ग.स.चे माजी चेअरमन सुनिल सुर्यवंशी, बांधकाम विभागातील नंदु पवार व भुषण तायडे या तीन कर्मचार्यांची चौकशी केली. या तीघांची तब्बल दोन दिवस कसुन चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. अजूनही ते
चौकशीच्या रडारवर आहेत. दरम्यान त्यांची शुक्रवारी 17 रोजी मुंबई येथे सीबीआय चौकशीसाठी प्राचारण करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
तिघांनी घेतली दोन दिवसाची रजा
नोटाबंदी प्रकरणी चौकशीच्या रडावर असलेल्या जिल्हा परिषदेतील सुनिल सुर्यवंशी, नंदु पवार, भुषण तायडे या तिन्ही कर्मचार्यांनी दोन दिवसाची रजा घेतली आहे. तिघांची मुंबईला सीबीआय चौकशी होणार असल्याने तिघांनी गुरुवारी 16 पासुन दोन दिवसाचा रजेचा अर्ज भरुन कार्यालयात जमा केलेला आहे. उपमुख्यकार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी यांच्या मुलाचे लग्न 5 मार्च रोजी होते त्यामुळे ते अगोदरच रजेवर आहेत. वाणी 10 मार्च रोजी हजर होणार होते परंतु अद्यापही ते हजर झालेले नसल्याचे दिसते.
खडसेंची सत्व परिक्षा!
जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसें याच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर ह्या आहेत. तसेच आतापर्यत सीबीआय चौकशीच्या कचाट्यात अडकलेले सर्व खडसेंचे समर्थक असल्याचे बोलले जात आहे. नोटबदली प्रकरण उघडकीस आल्यानंतर खडसेंकडे अंगुली निर्देश केले जात आहे. तसे जाहीर आरोपही नेत्यांकडून केले जात आहे. आधीच एकनाथ खडसे हे भोसरी जमीन खरेदी प्रकरणातून सहीसलामत सुटलेले नाहीत. सुनावणी पूर्ण झाली असली तरी न्या. झोटिंग समितीने अंतिम निर्णय दिलेला नाही. त्यातच नोटबदलीचे प्रकरणी खडसेंच्या अधिपत्याखाली असलेल्या जिल्हा बँके ची चौकशी होत असल्याने यातुन खडसेंची सत्व परीक्षा असल्याचे दिसते आहे.
सुर्यंवंशीनी दिला ग.स.चा राजीनामा
ग.स.सोसायटी ही सर्वात मोठी संस्था असून चलनातील बंद झालेल्या नोटा बदल केल्याप्रकरणी सीबीआयने माजी चेअरमन सुनील सूर्यवंशी यांची चौकशीनंतर केल्यानंतर सोसायटीची प्रतिमा मलीन होऊ नये यासाठी त्यांच्या संचालकपदाच्या राजीनाम्याबाबत दबाव येत होता. अखेर त्यांनी बुधवारी 15 रोजी संध्याकाळी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालकपदाचा राजीनामा वरिष्ठ नेत्यांकडे सोपविला. सुवर्यवंशी यांच्या राजीनाम्याबाबत अत्यंत गोपनीयता बाळगण्यात येत आहे.
ग.स. सोसायटीची प्रतिमा मलिन होऊ नये याकरिता सूर्यवंशी यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. या संबंधी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते संपर्कक्षेत्राच्या बाहेर असल्याचे दिसून आले. ग.स.च्या संचालकांशी संपर्क साधला असता त्यांनी संचालक मंडळातील वरिष्ठ नेत्याकडे राजीनामा सुपूर्द केल्याचे सांगितले.
नंदु वाणींचीही चौकशी?
नोटबदलीचे धागेदारे जिल्हा परिषदेपर्यत पोहोचल्याने अन्वेषन विभागाने जिल्हा परिषदेत येऊन चौकशी केल्यानंतर याठिकाणी सन्नाटा पसरलेला दिसत आहे. तीन कर्मचारी चौकशीच्या रडावर असतांनाच जिल्हा परिषद सामान्य प्रशासन उपमुख्यकार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी यांच्यावर देखील सीबीआचे नजर असुन त्यांची देखील 17 रोजी सीबीआय चौकशी होणार असल्याची चर्चा आहे. चौकशीच्या रडावर असलेले सुनिल सुर्यवंशी हे त्यांच्याच विभागात सध्या कक्षाधिकारी म्हणून कार्यरत आहे. याबाबत वाणी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांचा भ्रमणध्वनी ‘नॉट रिचेबल’ दाखवित होते. वाणी हे एकनाथराव खडसे यांचे निकटवर्तीय मानले जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते जळगाव जिल्हा परिषदेत कार्यरत आहे.