नोव्हेंबरमध्ये डब्ल्यूटीए ओपन टेनिस स्पर्धा

0

मुंबई। भारतात पाच वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्या डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई ओपन या नावाने ही स्पर्धा ओळखली जाणार असून सुमारे एक लाख 25 हजार डॉलर्स इतक्या पुरस्कार रकमेची ही स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात खेळवण्यात येईल. या स्पर्धेमुळे देशातील होतकरू गुणी महिला टेनिसपटूंना जागतिक क्रमवारीतील आघाडीच्या 50 महिला टेनिसपटूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य टेनिस संघटनेने या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी उचलली आहे. राज्य संघटनेने नुकतेच भारतासाठी देण्यात आलेल्या एटीपी टूर स्पर्धेतील चेन्नई ओपन स्पर्धेचे यजमानपद मिळवले आहे. त्यामुळे ही स्पर्धा आता महाराष्ट्र ओपन या नावाने ओळखली जाणार आहे.

राज्य टेनिस संघटनेचे सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, अंकिता रैना, करमन कौर थंडी, रुजुता भोसले आणि देशातील इतर चांगल्या महिला टेनिसपटूंना वरच्या दर्जाच्या टेनिसपटूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याचा उपयोग महिला टेनिस क्रमवारीतले स्थान उंचावण्यासाठी होऊ शकतो. खेळाडूंमध्ये जोश निर्माण होण्यासाठी स्पर्धा मुंबईत आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई ओपन स्पर्धेतील मुख्य लढती आणि पात्रता फेरीसाठी चार वाईल्ड कार्ड प्रवेश देण्यात येणार आहेत. देशातील आघाडीच्या महिला टेनिसपटूंना त्याचा फायदा मिळेल. पुण्यात 2012 मध्ये झालेल्या रॉयल इंडियन ओपन महिला टेनिस स्पर्धेत सध्या जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या एलिना स्वितोलीनाने जपानच्या किमिको डेट-क्रुमला हरवून विजेतेपद मिळवले होते.