पिंपरी-चिंचवड । महाराष्ट्रातल्या मातीमधील खेळ, अशी ओळख असणार्या कुस्तीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच कुस्तीपटूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रथमच महाराष्ट्र प्रिमियर कुस्ती लीग स्पर्धेचे येत्या नोव्हेंबर महिन्यात आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माजी महापौर व पुणेरी पॉवर संघाचे मालक आझम पानसरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेला महापौर नितीन काळजे, स्पर्धेचे मुख्य आयोजक वैभव लांडगे, नगरसेवक राहुल जाधव, कार्तिक लांडगे, सुनील भिंगारे, उमेश जोगळेकर, नामदेव लंगोटे आदी उपस्थित होते. कुस्ती प्रिमियर लीगचे ब्रँड अॅबेसिडर म्हणून द ग्रेट खली व पै. योगेश्वर दत्त यांची निवड करण्यात आल्याचे मुख्य आयोजक वैभव लांडगे यांनी सांगितले.
आठ संघांचा समावेश अहमदनगर जिल्हा तालिम संघ यांच्या वतीने, भारतीय कुस्तीगीर महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रिमियर कुस्ती लीगचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पिंपरी-चिंचवड, अहमदनगर व कोल्हापूर या तीन शहरांमध्ये होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये होणार आहे. स्पर्धेत आठ संघ असणार आहे. आतापर्यंत अहमदनगर येथील अभिषेक भगत यांनी ’दख्खनचा काला चित्ता’, उद्योगपती संजय किर्लोस्कर यांनी ’किर्लोस्करवाडीचा योद्धा’ व आझम पानसरे यांनी ’पुणेरी पॉवर’ हे संघ विकत घेतले आहेत. या लीगमध्ये 64 कुस्तीपटू असणार आहेत. यातील महाराष्ट्रातील 32 मल्ल खेळणार असून, 16 राष्ट्रीय व 16 आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग आहे.
प्रत्येक संघात सहा पुरूष व दोन महिला कुस्तीपटू असणार आहेत. पुरुषांचा 57, 65, 74, 86 आणि 97 किलो वजन गट असणार आहे. तर, महिलांचा 48 व 58 किलोचा वजनगट असणार आहे. विजेत्या संघांना भरघोष पारितोषिके स्पर्धेतील विजेत्या संघाचा उद्योगपती सायरस पुनावाला यांच्या वतीने 21 लाख रुपये रोख व अर्धा किलो सोन्याची गदा, द्वितीय विजेत्या संघाला 11 लाख रुपये रोख व पाच किलो चांदीची गदा तर तृतीय क्रमांकावरील विजेत्या संघाला 7 लाख रुपये रोख व चषक देण्यात येणार असल्याचे वैभव लांडगे यांनी सांगितले. महापौर नितीन काळजे म्हणाले, महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा आहे. अनेक दिग्गज मल्लांनी आपल्या उत्तुंग कामगिरीने कुस्तीची मैदाने गाजवून या खेळाला नावलौकिक मिळवून दिला. महाराष्ट्र प्रिमियर कुस्ती लीगमुळे या मर्दानी कुस्तीला पुन्हा गतवैभव मिळण्यास हातभार लागेल, असे त्यांनी सांगितले.