‘नो पार्किंग’च्या कारवाईचा मनमानी कारभार

0

हडपसर (अनिल मोरे) । वाहतूक पोलीस चौकी म्हटले की वाहनचालकांच्या अंगावर काटा येतो, पोलिसांपेक्षा आता टेम्पोवरील कंत्राटी कर्मचारी दमदाटी करून लुबाडत आहेत. त्यामुळे आता या कर्मचार्‍यांची तक्रार कोणाकडे करायची हा सवाल निर्माण झाल्याने वाहनचालक या मुजोर कर्मचार्‍यांच्या दबावाला बळी पडत आहेत. ‘नो पार्किंग’ कारवाई करणार्‍या वाहतूक शाखेच्या कंत्राटी कर्मचार्‍यांची मुजोरी वाढत चालली असून, त्याच्या आडून वाहनचालकांना लुबाडण्याचे प्रकार सुरू आहेत. वाहतूक पोलीस इतरत्र दंग असल्याने हे कर्मचारी वाहनचालकांना मानसिक आणि आर्थिक त्रास देत आहेत.

हडपसरमध्ये सक्षम पार्किंग व्यवस्था नाही, फलक नाही, वाहन उचलण्याचे कंत्राट खासगी व्यक्तीने घेतले आहे, वाहने आणल्यावर पोलिसांचा दंड व कंत्राटी टेम्पोचे भाडे असा दंड आकारला जातो. त्यामुळे जास्तीत जास्त वाहने उचलण्याचा सपाटा असतो. वाहनचालकांनी फोन लावला की वाहतूक पोलीस असल्यासारखे दमदाटी करतात.

वाहतूक पोलिसांशी वाद
हडपसरमध्ये दुचाकी पार्किंग कारवाई करताना वाहतूक पोलीस व वाहनचालक यांच्यात नेहमी वाद होतात. वाहतूक पोलीस वाद घालणार्‍या वाहनचालकांच्या वाहनांचे क्रमांक घेऊन ऑनलाइन दंडाची कारवाई करतात. कधीकधी तर वादाचे हे प्रकार पाहून नागरिकांचे मनोरंजनही होते.

वाहतूक शाखेचा विचित्र अनुभव
वेशीसमोर मनोहर क्लॉथपाशी गाडी लावून डॉ. झांजुर्णेंकडे गेलो होतो. परत आल्यावर गाडी उचलून नेल्याचे लक्षात आले. वाहतूक शाखेत गेल्यावर तेथील कर्मचारी मुलांनी मोठा गुन्हा केल्याप्रमाणे बाराशे-पंधराशे रुपये मागायला सुरुवात केली. नो पार्किंगचा जो दंड असेल तो घेऊन त्याची रितसर पावती द्या असे सांगितले. त्यावर पोलिसांना भेटू न देता त्यांनी बळजबरीने 850 रुपये घेतले. यावर वेळीच एकत्र येऊन आवाज उठवला गेला पाहिजे.
अनंत झांबरे, योगगुरू, आरोग्यम् संस्था

वाहतूक पोलीस कारवाई करतात. कर्मचारी वाहने उचलण्यासाठी आहेत, मात्र कर्मचारी कोणी त्रास देत असतील तर त्यांनी आमच्याकडे तक्रार करावी.
-प्रभाकर शिंदे, पोलीस निरीक्षक, वाहतूक