पिंपरी-चिंचवड : आकुर्डी येथील जय गणेश व्हिजनसमोर तसेच शुभश्री रेसिडेन्सीजवळ नो पार्किंगमध्ये थांबणार्या वाहनांमुळे वाहतूककोंडीची समस्या उद्भवत होती. यासंदर्भात स्थानिकांकडून सातत्याने तक्रारी होत असल्याने निगडी वाहतूक शाखा व महापालिका प्रशासनाने सोमवारी दुपारी संयुक्तरित्या कारवाई मोहीम राबवली. वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्यांनी नो पार्किंगमध्ये थांबलेल्या 13 चारचाकी अवजड वाहनांसह दुचाकींवर कारवाई करत वाहन मालकांकडून प्रत्येकी 200 रुपये यानुसार, दोन हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला. तर महापालिकेच्या पथकाने तीन अवजड वाहनांवर कारवाई करत वाहन मालकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारला. कारवाईवेळी प्रभागाचे नगरसेवक प्रमोद कुटे हेदेखील हजर होते. या कारवाईमुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला.
मालती ट्रॅव्हल्स व मरहबा रोडवेजची वाहने
जय गणेश व्हिजनसमोरील मुख्य रस्त्यावर नेहमी मालती ट्रॅव्हल्स व मरहबा रोडवेजची अवजड वाहने बेकायदा थांबलेली असतात. निगडी वाहतूक शाखेने सोमवारी मालती ट्रॅव्हल्स व मरहबा रोडवेजच्या बस आणि टँकर या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. महापालिकेच्या पथकाने वाहन मालकांकडून लेखी हमीपत्र लिहून घेतले. ही कारवाई निगडी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पोलीस हवालदार दत्तात्रय राऊत, पोलीस नाईक अमोल कोळेकर, प्रशांत अहिवळे, पोलीस शिपाई राहूल धोत्रे, श्याम कुंभार यांनी केली.
मालती ट्रॅव्हल्स व मरहबा रोडवेजची वाहने रस्त्यावर बेकायदा थांबत असल्याने वाहतूककोंडी होत होती. यासंदर्भात यापूर्वीही संबंधितांना सूचना दिल्या होत्या. परंतु, त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात होते. शेवटी वाहतूक विभाग व महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानुसार सोमवारी कारवाई झाली. यापुढे येथे वाहने थांबली तर पुन्हा कारवाईसाठी पाठपुरावा करू.
-प्रमोद कुटे, नगरसेवक