नेरुळ । वाशी सेक्टर 26 कोपरीगाव पामबीच मार्गावर नो पार्किंग झोनमध्ये अवैधरित्या विक्री करण्यासाठी वाहने उभी करण्यात आली आहेत. उभ्या केलेल्या वाहन विक्रेत्यांवर एपीएमसी वाहतूक शाखेच्यावतीने काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली. मात्र कारवाई फक्त दिखाव्यापुरतीच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कारवाईनंतर पुन्हा परिस्थिती जशी आहे तशी पाहायला मिळत आहे. कोपरी गाव सेक्टर 26 येथील वाहन विक्रेते आपली वाहने रस्त्यावर व पदपथावर बिनधास्त विक्रीसाठी उभी करत असतात. त्यामुळे सामान्य नागरिकांना चालण्यास त्रास तर होतोच शिवाय दररोज वाहतूककोंडीचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागत आहे. वाहतूक शाखेच्या वतीने केलेल्या कारवाईत एकूण दहा वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
भविष्यात त्यांनी अशी बेकायदेशीरपणे आपली वाहने रस्त्यावर उभी करू नयेत. अन्यथा यापुढे ही मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा समज एपीएमसी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मच्छींद्र खाडे यांनी सांगितले, तर ही कार्रवाई नुसती दिखावा असल्याचे येथील स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले. कारण जवळपास 150 ते 200 च्या घरात येथे दररोज हे वाहन विक्रेते आपली वाहने विक्रीसाठी ठेवतात. असे असताना फक्त 10 वाहनावर करवाई करणे म्हणजे वाहतूक शाखा अधिकार्यांच्या कार्यतत्परतेवर शंका उपस्थित करते. वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे येथील वाहन विक्रेत्यांचे फावले आहे. त्यामुळे वाहन विक्रेता आणि वाहतूक शाखेच्या अधिकारी यांच्या कारवाईवर नागरिक संशय व्यक्त करू लागले आहेत.