जळगाव । महापालिकेकडून तीन दिवसांपासून सुरु केलेल्या अतिक्रमण मोहीमेने आता रस्त्यांवरील गटारींवर बांधण्यात आलेले अनधिकृत रॅम्प व त्यावरील टपर्या, दुकानांना लक्ष केले आहे. आज सकाळी भिलपुरा चौकाच्या रस्त्यांवरील रॅम्प व टपरी काढण्यात सुरवात करताच गर्दी होवून गोंधळ निर्माण झाला. अखेर अतिक्रमणधारकांनी स्वत:हून रॅम्प काढून गटार मोकळी करण्याचे मान्य केल्याने त्यांना सांयकाळपर्यंतची मुदत देण्यात आली. महापालिकेतर्फे करण्यात येणार्या कारवाईस नागरिकांनी विरोध केल्याने तेथे थोडावेळ गोंधळ निर्माण झाला होता.
रॅम्पनी झाकल्या गटारी
बळीरामपेठेत कारवाई केल्यानतंर अतिक्रमण पथकाने भिलपूरा चौक रस्त्यावर मोहीमेस सुरुवात केली. त्यावेळी रस्त्याच्या बाजूच्या गटारीवर रॅम्प बांधून गटार बंद केल्याचा प्रकार समोर आला. 5 ते 8 फुटाचे रॅम्प करुन गटार झाकून टाकण्यात आली आहे. तसेच त्यावर टपरी, दुकाने अशी अतिक्रमणे करण्यात आली आहेत. पथकाने या रस्त्यावरील एक टपरी उचलली तसेच गटारीवरील बांधकाम तोडण्यास सुरुवात केली.
स्वतः रॅम्प तोडण्याचे आश्वासन
पालिकेच्या कारवाईला विरोध करण्यासाठी परिसरातील नागरिक व व्यापार्यांचा मोठा जमाव झाला. पथक व जमावात कारावाईवरुन शाब्दिक चकमक घडली. त्यानंतंर घटनास्थळी माजी नगरसेवक कैलास सोनवणे व उपायुक्त लक्ष्मिकांत कहार देखिल आले. यावेळी श्री. सोनवणे व उपायुक्तांनी जमावाला समजावून सांगीतले. यानंतर तेथील नागरिकांनी स्वत:च रॅम्प तोडून गटार मोकळी करुन देण्याचे मान्य केले.
पथक परतले माघारी
सायंकाळपर्यंत रॅम्प न काढल्यास उद्या पालिका जेसिबीद्वारे रॅम्प व त्यावरील अतिक्रमणे जमिनदोस्त करण्यात येईल असा इशारा महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने यावेळी दिला. यानतंर जमाव माघारी फिरला. दरम्यान, महापालिकेकडून हॉकर्सविरुध्द धडक मोहीम सुरु करण्यात आली आहे. ‘नो हॉकर्स झोन‘मधील हॉकर्सला हटवून त्यांचे साहीत्य, हातागाड्या व टपरी जागेवरच जेसीबीने तोडण्याची कारवाई सुरु करण्यात आली असून या कारवाईच्या विरोधात हॉकर्सनी महापालिकेसमोर बेमुदत
उपोषण सुरु केले आहे.