नौकानयनपटूंची दमदार कामगिरी; सांघिक प्रकारात सुवर्ण

0

जकार्ता-आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय नौकानयनपटूंने दमदार कामगिरी सुरुच ठेवली आहे. भारताच्या संघाने सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारतीय संघाने ६:१७:१३ अशी वेळ नोंदवत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पिछाडीवर टाकले. या स्पर्धेतले भारताचे हे पाचवे सुवर्णपदक ठरले आहे.

भारताच्या दत्तु भोकनळ, स्वर्णसिंह, ओम प्रकाश आणि सुखमित सिंह जोडीने भारताला नौकानयनात पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. याआधी सकाळच्या सत्रात दुष्यंत चौधरीने पुरुषांच्या लाईटवेट सिंगल स्कल्स प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. दुष्यंतने ७:१८:७६ अशी वेळ नोंदवली. या प्रकारात कोरियाच्या खेळाडूला सुवर्ण तर हाँग काँगच्या खेळाडूला रौप्यपदक मिळाले. यापाठोपाठ भारताच्या रोहित कुमार , भगवान सिंह जोडीलाही लाईटवेट डबल स्कल्स प्रकारात कांस्यपदक मिळाले.

भारतीय कबड्डी पुरुष संघाला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर आज एशियाड स्पर्धेच्या सहाव्या दिवशी महिला संघ सुवर्णपदकासाठी मैदानात उतरणार आहेत. भारतीय महिला संघासमोर अंतिम फेरीत इराणचे आव्हान असणार आहे. याव्यतिरीक्त अॅथलेटिक्समध्ये दिपा कर्माकरही सुवर्णपदकाच्या शर्यतीत असेल. नेमबाजीत मनू भाकेर आणि हिना सिद्धु १० मी. एअर पिस्तुल प्रकारात खेळतील. २५ मी. रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात भारताच्या अनिश भनवाला खेळेल.टेनिस दुहेरी प्रकारातही भारताला आज एका सुवर्णपदकाची आशा आहे. रोहन बोपण्णा-दिवीज शरण जोडी अंतिम सामन्यात खेळणार आहे.