स्वरस्वती, अंतर्नाद आणि महक संस्थेच्यावतीने ’तु ही नजरों में…तु ही नजारों में’ कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : तेरी बिंदीया रे, होठो मे ऐसी बात, ऐसे न मुझे तुम, नैन लडजै, लेकर हम दिवाना दिल, गुम है किसीं..अशा एक से बढकर एक गीतांच्या सादरीकरणामुळे ’तु ही नजरों में…तु ही नजारों में’तून नौशाद अली-मजरुह सुलतानपुरींच्या आठवणींना उजाळा मिळाला. गायक जितेंद्र अभ्यंकर, अली हुसेन, गायिका मनीषा निश्चल, भाग्यश्री अभ्यंकर यांच्या बहारदार गायनाने यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ’नौशाद-मजरुह’मय झाले.
प्रसिद्ध संगीतकार नौशाद अली आणि गीतकार मजरुह सुलतानपुरी यांच्या जन्मशताब्दी निमित्त स्वरस्वती, अंतर्नाद आणि महक या संस्थांच्या वतीने ’तु ही नजरों में…तु ही नजारों में’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गाण्याच्या मैफलीने रसिक मंत्रमुग्ध झाले. मजरुह सुलतानपुरी आणि नौशाद यांनी अजरामर केलेल्या या गीतांना रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
बहारदार गाण्यांचे सादरीकरण
मनीषा निश्चल, जितेंद्र अभ्यंकर यांच्यासह भाग्यश्री अभ्यंकर व अली हुसेन यांनी बहारदार गाणी सादर केली. लयबद्ध संगीत संयोजन केदार परांजपे यांनी केले. सुलभा तेरणीकर यांच्या आशयपूर्ण निवेदननाने नौशाद-मजरुह यांना प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी रसिकांना दिली. प्रसाद गोंदकर (सतार), रमाकांत परांजपे (व्हायोलिन), विक्रम भट, केदार मोरे (ढोलकी), अभिजित भदे, विशाल थेलकर, विजू मूर्ती, दर्शना जोग, निलेश देशपांडे व बाबा खान यांनी साथसंगत केली.