नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या कारभाराविरोधात उघड नाराजी व्यक्त करणार्या चौघा न्यायमूर्तींपैकी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी न्यायपालिकेवर कोणतेही संकट नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायमूर्तींमध्ये निर्माण झालेली दरी मिटण्याची चिन्हे आहेत.
एका कार्यक्रमात न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. मात्र यावर अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. न्यायपालिकेवरील आलेले संकट दूर करण्यासाठी काय मार्ग आहे? असा प्रश्न विचारला असता गोगोई म्हणाले, कोणतेही संकट नाही. आता मला लखनऊला जाण्यासाठी विमान पकडायचे आहे. यावर मी अधिक बोलू शकत नाही. दरम्यान, केरळ येथील एका कार्यक्रमात न्यायमूर्ती जोसेफ यांनीही आम्ही केवळ ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली आहे, असे म्हटले होते.