नवी दिल्ली: दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यांच्या बदलीवरून सद्ध्या राजकीय वातावरण तापू लागले आहे. काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. न्यायाचे काम करणाऱ्यांना माफ केले जात नाही असे म्हणत दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांच्या बदलीवरूनही काँग्रेसने टीकास्त्र सोडले आहे.
न्यायाधीश एस. मुरलीधर हे दिल्लीत द्वेष परसवणारी तसेच भावना भडकवणारी भाषणे देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात सुनावणी घेत होते. त्यांची रातोरात बदली करण्यात आली असे सुरजेवाला म्हणाले. सुरजेवाला यांनी यांची तुलना ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणाशी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधताना रणदीप सुरजेवाला यांनी तीन प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रश्नांची उत्तरे द्यावी असे आवाहन सुरजेवाला यांनी केले आहे.
भाजपच्या सरकारकडून न्यायपालिकेवर अशा प्रकारे दबाव टाकण्याची ही पहिलीच वेळ नसल्याचेही सुरजेवाला म्हणाले. या वेळी त्यांनी गुजरात दंगलीचा आवर्जून उल्लेख केला. गुजरात दंगलीत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात वकील असलेले सुप्रीम कोर्टाचे प्रसिद्ध ज्येष्ठ अॅडव्होकेट गोपाल सुब्रमण्यम याची नियुक्ती मोदी सरकारने सुप्रीम कोर्टाच्या कॉलिजीयमचया आदेशाची पर्वा न करता बळजबरीने रोखली होती असे सुरजेवाला म्हणाले. या व्यतिरिक्त सुरजेवाला यांनी उत्तराखंडमधील प्रकरणाचाही उल्लेख केला.