न्यायालयाचा प्रफुल्ल पटेलांना दिलासा

0

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती दिल्यामुळे प्रफुल्ल पटेल यांना दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशामुळे पटेल यांचे भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्शपद कायम राहणार असल्याचा दावा महासंघाने केला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या प्रमुखपदी प्रफुल्ल पटेल यांची झालेली निवड एका आदेशानुसार रद्द केली होती. सर्वोच्च न्यायलयाच्या या निर्णयामुळे पटेल यांना दिलासा मिळाला असला तरी भारताचे माजी गोलकिपर भास्कर गांगुली यांची महासंघाच्या लोकपाल नियुक्ती करुन अंकुशही ठेवला आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या निवडणुकीत राष्ट्रीय क्रीडा संहितेचे पालन झाले नसल्याचा ठपका ठेवत दिल्ली उच्च न्यायलयाने ही निवडणुक रद्द केली होती. महासंघातील कुठल्याही पदाधिकार्‍याने एक पदावर चार वर्षांचे दोन कार्यकाळ पूर्ण केल्यावर संबधित पदाधिकारी पुढील चार वर्षे महासंघातील कुठलेही पद स्विकारु शकत नाही आणि कुठल्याही पदाची निवडणुक लढवू शकत नाही असा महासंघाचा नियम आहे. पटेल यांनी 2009 मध्ये प्रियरंजन दासमुंशी यांच्याकडून महासंघाचे प्रमुखपद स्विकारले होते. त्याआधी पटेल महासंघात उपाध्यक्श होते.

कोण आहेत गांगुली
भास्कर गांगुली यांचा देशातील आघाडीच्या गोलकिपरमध्ये समावेश होतो. गांगुली हे राजधानी दिल्लीत 1982 साली झालेल्या एशियाड स्पर्धेत भारताच्या फुटबॉल संघाचे कर्णधार होते. गांगुली हे दोन सदस्य असलेल्या समितीचे प्रमुख असतील. ही समिती भारतीय फुटबॉल महासंघाच्या कामकाजावर देखरेख करील. गांगुली यांच्या जोडीने देशाचे माजी निवडणुक आयुक्त एस वाय कुरेशी यांचा या समितीत समावेश आहे. गांगुली समितीवर आठ आठवड्यांच्या कालावधीत महासंघाची नविन घटना तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.