न्यायालयाच्या निर्णयाचे समलैंगिक संबंधाच्या पुरस्कर्त्यांकडून स्वागत

0

नवी दिल्ली-समलैंगिकांनाही समान अधिकार आहेत, त्यामुळे दोन सज्ञान व्यक्तींनी ठेवलेले संबंध ही खासगीबाब आहे, त्यामुळे तो गुन्हा ठरत नाही, असा ऐतिहासिक निर्णय आज सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे समलैंगिक संबंधाच्या पुरस्कर्त्यांनी स्वागत केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासूनची आमची प्रतिक्षा संपुष्टात आली. आता आम्ही खुलेपणाने समाजात वावरू, आम्ही गुन्हेगार नाही, आम्ही स्वातंत्र्यपणे जगू असा अशा शब्दांत आपला आनंद समलैंगिक पुरस्कर्त्यांनी जाहीर केला आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना अनेकांना आपले आनंदाश्रू आवरता आले नाहीत.

एकमेकांच्या लैंगिकतेचा आदर

हा अत्यंत महत्वाचा निर्णय असून समाजातील गैरसमज निवळण्यासाठी या निर्णयाचा खूप फायदा होईल. पूर्वी ही ओळख लपवली जात. त्यामुळे एका कुटुंबाचे यात नुकसान होत. या निर्णयामुळे लोक आता खुलेपणाने बोलतील. एकमेकांच्या लैंगिकतेचा आदर करायला हवा.

गौरी सावंत, समलैंगिक संबंधाच्या पुरस्कर्त्या

सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही आभारी

गेल्या १८ वर्षांपासून आम्ही याची वाट पाहत होतो. आम्ही गुन्हेगार नाही, आम्हाला स्वतंत्रपणे जगू द्या, आम्ही या निकालाने खूप आनंदी झालो आहोत. या ऐतिहासिक निर्णयासाठी सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही आभारी आहोत.

टिनेश चोपडे, समलैंगिक संबंधांचे पुरस्कर्ते

कलंक पुसला जाणार

आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आता आम्ही नवीन दिशेने जाऊ. आजच्या निकालाने मनातील भीती कमी होईल. बदल हा हळूहळू होत असतो. आम्ही आमचा हक्क मागत असताना आता तो मोकळेपणाने मागू. अत्याचाराविरोधात आम्ही पोलिसांकडे, न्यायालयात जाऊ शकतो. आता आम्ही गुन्हेगार नाही. गुन्हेगारीचा कलंक पुसणे आवश्यक होते. तो आज पुसला गेला.

सारंग भाकरे, समलैंगिक संबंधाचे पुरस्कर्ते