न्यायालयात तारखेवर आले अन् वकिलाचीच लांबविली होती दुचाकी

0

दुचाकीचोर विभोरचा गुन्हेगारीपर्यंत अजब प्रवास

कारागृहातून बाहेर पडल्यावर सराईत गुन्हेगार बनला

जळगाव- गावातीलच अल्पवयीन मुलीला प्रेमप्रकरणातून पळवून नेले. गुन्हा दाखल झाला, पोलिसांनी अटक करुन याप्रकरणा शिक्षाही झाली. शिक्षा सुनावल्यावर कारागृहात गेला अन् येथूनच त्याचा गुन्हेगारीचा प्रवास सुरु झाला. व सराईत गुन्हेगार बनला. शहर पोलिसांनी चार दुचाकीसह ताब्यात घेतलेल्या विभोर जुला जाधव रा.जवखेडा ता.एरंडोल या दुचाकीचोराची ही कहाणी आहे. न्यायालयात तारखेवर आल्यावर विभोरने साथीदार गौतम सोनवणेसह वकिलाचीच दुचाकी लांबविल्याची माहितीही चौकशीत समोर आली आहे.

एरंडोल तालुक्यातील उच्चशिक्षित असलेल्या विभोरने विज्ञान शाखेची पदवी घेतली. त्यानंतर तो पुणे येथे एका कंपनीला चांगल्या पगाराच्या नोकरीवर लागला. यादरम्यान गावातील एका मुलीला त्याने प्रेमप्रकरणातून पळविले. मात्र मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला. अन् विभोर मुलीसह पोलिसांच्या हाती लागला. या खटल्यात त्याला शिक्षा सुनावण्यात आली. व विभोर ती भोगण्यासाठी कारागृहात आला.

कारागृहात आला अन् गुन्हेगार बनला
गुन्हा घडल्यानंतर अनेक जण कारागृहात येतात पण सुधारुन जातात. मात्र विभोरच्या बाबतीत उलटेच घडले. विभोरचे कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यात असलेले काही कैदी मित्र झाले. येथून सुटल्यावर त्याने याच मित्रांच्या मदतीने पिंपळगाव हरेश्‍वर ता.पाचोरा येथे दरोडा टाकला होता. यानंतर त्याचा गुन्ह्ेगारीचा प्रवास सुरु झाला.

खूनाच्या गुन्ह्यातील गौतमशी गट्टी जमली
दरोड्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केल्यावर त्याची कारागृहात रवानगी झाली. याठिकाणी त्याची मेहुणबारे ता.चाळीसगाव येथील खूनाच्या घटनेत कारागृहात असलेल्या गौतम सोनवणे याच्याशी मैत्री जमली. बाहेर पडल्यावर दोघांनी मिळून मास्टर चाबीच्या सहाय्याने शहरात ठिकठिकाणाहून दुचाकी चोरी केल्याचे समोर आले आहे.

सीसीटीव्हीत कैद झाले अन् जाळ्यात
5 फेब्रुवारीला न्यायालयात तारखेवर आलेल्या विभोर व गौतमने वकिलाची दुचाकी लांबविली होती. हा प्रकार येथील सीसीटीव्हीत कैद झाला होता. याच सीसीटीव्ही फुटेजवरुन गुन्ह्याचा तपास असलेले गुन्हे शोध पथकातील अक्रम शेख यांच्यासह सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, हवालदार विजयसिंग पाटील, संजय शेलार, बशीर तडवी, अक्रम शेख, अमोल विसपुते, प्रितम पाटील, गणेश शिरसाळे, दीपक सोनवणे, इम्रान सैय्यद, सुधीर साळवे या पथकाने दोघांना अटक केली होती. पथकाने त्यांच्याकडून 4 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून आणखी दुचाकी सापडण्याची शक्यता आहे.

विभोरचे ‘शाईन’ दुचाकी प्रेम
विभोरने साथीदार गौतम सोनवणेसह शहरातून चोरलेल्या सर्व गाड्या या हिरोहोंडा शाईन कंपनीच्या आहेत. शाईन ही विभोरच्या सर्वात आवडीची दुचाकी असल्याचेही चौकशीत समोर आले आहे. विभोर पैशांसाठी नव्हे तर केवळ हौस म्हणून दुचाकी चोरी करतो. यानंतर कुठेतरी पार्किंगमध्ये लावून तो पसार होतो. त्याच्याकडून मिळालेल्या चार पैकी दोन दुचाकी त्याने बांभोरी महाविद्यालया बाहेरुन मिळाल्या होतो.