नवी दिल्ली । खबरदार आता न्यायपालिकेविरोधात बोलाल तर आता तुमच्या तोंडाला लावणार कायद्याचे कुलूप. सध्या सर्वोच्च न्यायालयातील वादग्रस्त घडामोडींमुळे न्यायपालिकेबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेविरोधात पुराव्यांअभावी न्यायालयाकडून निर्णय दिला जातो. हा निर्णय दिला जात असताना न्यायालयाविरोधात अनेक वक्तव्ये केली जातात. मात्र, यापुढे न्यायालयाविरोधात अशी वक्तव्ये करणार्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. दाखल केलेल्या या याचिकेवर खंडपीठाकडून मंगळवारी सुनावणी घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
वक्तव्यास लगाम द्यावा
न्यायालयाविरोधात चुकीचे वक्तव्य करणार्यांवर कारवाई करण्याबाबत वकील आणि भाजपचे नेते गौरव भाटिया यांनी याचिका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दाखल केलेली ही याचिका स्वीकारली आहे. या याचिकेमध्ये भाटिया यांनी आरोप केले की काही वकील आणि राजकारणी सोशल मीडिया आणि वृतवाहिन्यांवर न्यायालयाविरोधात चुकीचे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे यावर लगाम लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पावले उचलली जावी. गौरव भाटिया यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठाच्या समक्ष प्रकरणाचा दाखला दिला.
आक्षेपार्ह ट्वीटचा दाखला दिला
या प्रकरणातील गौरव भाटिया यांनी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या ट्वीटचा दाखल दिला आहे. काही ट्वीट असे आहेत, की ते न्यायालयात दाखवताही येऊ शकत नाहीत तसेच वकील आणि नेत्यांविरोधात अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, याबाबत त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांची ही याचिका न्यायालयाने स्वीकारली आहे. त्यामुळे यापुढे न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बोलणार्यांविरोधात कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. काही ज्येष्ठ वकील आणि नेते सार्वजनिकरीत्या न्यायपालिका आणि न्यायालयाविरोधात बोलत आहेत त्यावर लक्ष द्यायला हवे, असे ते म्हणाले.
काही ट्वीट असे आहेत, की ते न्यायालयात दाखवताही येऊ शकत नाहीत. वकील आणि नेत्यांविरोधात अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी.
-अॅड. गौरव भाटिया, भाजप.