न्यायालयासाठी आता नेहरुनगर येथील जागेचा पर्याय

0

शनिवारी न्यायाधीश करणार जागेची पाहणी

पिंपरी-चिंचवड : महापालिकेची अजमेरा कॉलनी येथील 24 वर्ग असलेली इमारत मोरवाडी न्यायालयासाठी भाडेतत्वार देण्यात येणार होती. मात्र, ही जागा न्यायालयाला देण्यासाठी विरोध वाढला आहे. त्यामुळे आता न्यायालयासाठी नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमसमोरील महापालिकेच्या इमारतीमध्ये जागा देण्याचा विचार सुरु आहे. या जागेची पाहणी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश येत्या शनिवारी (दि.11) करणार आहेत.

अजमेरातील जागेला विरोध
महापालिकेच्या अजमेरा कॉलनी, वास्तुउद्योग, सर्व्हे क्रमांक 144 येथील महापालिकेच्या तांत्रिक शाळा इमारतीमध्ये पिंपरी न्यायालयासह विविध न्यायालयांचे कामकाज सुरू करण्याचा निर्णय झाला होता; मात्र स्थानिक रहिवाशांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्याला विरोध केला आहे. अजमेरा कॉलनीतील इमारतीमध्ये न्यायालयाचे तब्बल 10 विविध विभागांचे कामकाज सुरू केले जाणार होते. तेथे एकूण 24 वर्गखोल्या असून, सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. मोडक यांनी 12 ऑक्टोबरला पाहणी केली.

नेहरूनगरात तयार इमारत
येथे कामकाज सुरू करण्यास त्यांनी मान्यता दिली होती. मात्र, स्थानिक रहिवाशांचा विरोध लक्षात घेऊन नेहरूनगर येथील मगर स्टेडियमसमोरील इमारतीमध्ये न्यायायलाचे कामकाज सुरू करण्याच्या पर्यायाचा विचार केला जात आहे. एकूण 22 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची तीन मजली इमारत आहे. तेथे वाहनतळासाठी मुबलक जागा उपलब्ध आहे. या इमारतीची पाहणी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व इतर अधिकारी शनिवारी करणार आहेत. त्यांनी सहमती दर्शविल्यास त्या ठिकाणी न्यायालयाचे कामकाज सुरू केले जाऊ शकते.

शहरात न्यायालय सुरू केल्याने येथील नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यांचा पुण्यात ये-जा करण्याचा प्रवास खर्च वाचणार आहे. त्या दृष्टीने नेहरूनगर येथील इमारतीचा नवा पर्याय समोर आला आहे. न्यायाधीशांनी त्यास मान्यता दिल्यास महापालिका आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यास तयार आहे.
-एकनाथ पवार, सभागृह नेते