न्यायासाठी शैलजा लोखंडे यांचे आमरण उपोषण

0

आळंदी : मरकळ ग्रामपंचायतीने कोणतीही पूर्वसूचना न देता पतीचे सलूनचे दुकान जेसीबीद्वारे पाडून टाकले. त्यामुळे दुकानातील साहित्याची मोडतोड होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले. या दुकानावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. मात्र, दुकानच पाडून टाकल्याने कुटुंब उघड्यावर आले. या अन्यायाविरोधात तीन वर्ष सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे घातले. तरीही न्याय न मिळाल्याने शैलजा एकनाथ लोखंडे (रा. मरकळ, ता. खेड) यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. गेल्या चार दिवसांपासून त्या उपोषणाला बसल्या असून, आपल्याला न्याय मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या उपोषणाची प्रशासनाने अद्यापही दखल घेतलेली नाही. ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात लोखंडे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला अनेक संघटना तसेच नागरिकांनी पाठिंबा दर्शविला आहे.

काय आहे प्रकरण
शैलजा लोखंडे यांचे पती एकनाथ लोखंडे यांचा मरकळ गावात 1996 पासून सलूनचा व्यवसाय आहे. मरकळ ग्रामपंचायतीने 19 एप्रिल 2014 रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता लोखंडे यांचे सलूनचे दुकान जेसीबीद्वारे पाडून टाकले. त्यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तसेच व्यवसाय बंद झाल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा राहिला. याबाबत लोखंडे व त्यांच्या पत्नी शैलजा यांनी तीन वर्ष सरकारी कार्यालयात न्यायासाठी हेलपाटे घातले. परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. आता एकनाथ लोखंडे यांची प्रकृती ठिक नसल्याने शेवटी शैलजा लोखंडे यांनी आमरण उपोषणाचा मार्ग निवडला. तीन वर्ष पाठपुरावा करुनदेखील सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांनी लोखंडे कुटुंबीयांना दाद दिली नाही. त्यामुळे लोखंडे यांनी आता उपोषणाद्वारे लढा देण्याचा निश्‍चय केला आहे.

उपोषणाला वाढता पाठिंबा
संबंधितांवर कारवाई होऊन आपल्याला न्याय मिळावा, या मागणीसाठी शैलजा लोखंडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला पुणे जिल्हा नाभिक संघटना, भोर तालुका नाभिक संघटना तसेच पुणे जिल्ह्यातील नाभिक समाजाचे प्रतिनिधी शिवाजी राऊत, शशी पालकर, शेखर जगताप, सुधीर गवळी, दत्त मोरे, उत्तम मंडलिक आदींनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. लोखंडे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी गावातून मूक मोर्चादेखील काढण्यात आला होता.

उपोषणस्थळी पोलीस बंदोबस्त
दरम्यान, बुधवारी उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी आळंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी उपोषणकर्त्या शैलजा लोखंडे यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून आळंदी पोलीस ठाण्याच्या वतीने उपोषणस्थळी पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी नियमितपणे लोखंडे यांच्या आरोग्याची तपासणी करीत आहेत.