न्याय्य हक्कासाठी बहूजन समाजाचे निवेदन

0

जामनेर । महु येथे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासह सोयगाव येथील जि.प.शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची झालेली विटंबना तसेच बुलडाणा जिल्ह्यात चर्मकार महिलेची नग्न धिंड काढणार्‍या गावगुंडावर कारवाई करण्यासह अशाच संदर्भातील आपल्या इतर मागण्या शासन व सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी तालूक्यातील आंबेडकरी बहुजन समाजाच्यावतीने शेकडोंच्या संख्येने एकत्र येवून भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.

या आहेत विविध मागण्या…
दरम्यान निषेधमोर्चाला कन्याशाळेच्या आवारातून प्रारंभ झाला. यात मोठ्या संख्येने नागरिक व महीलांनी या मोर्चाला हजेरी लावली.उत्तर प्रदेशातील सहारणपुर, गुजरात उना प्रकरण यांचाही निषेध करून कसत असलेल्या गायरान जमीनी या शेती कसणार्‍यांच्याच नावावर लावण्यात याव्या, शहरात समाजकल्याण विभागाचे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह सुरु करावे. तसेच जळगाव येथे बांधण्यात आलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे त्वरीत शासकीय लोकार्पण व्हावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी भगवान सोनवणे, राजू कदम, रवी बावस्कर, रत्नाकर जोहरे, ईश्वर सपकाळे, देवानंद जोहरे, विक्रम बनसोडे आंदीनी मागण्यांचे निवेदन तहसिलदार नामदेव टिळेकर यांना दिले.

सोयगाव बंदला नागरीकांचा प्रतिसाद
सोयगाव । येथील जिल्हा परिषद प्रशाळेतील बाह्यदर्शनी भिंतीवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैल चित्रावर अज्ञात व्यक्तीने शेन चिखल फेकून विटंबना केल्याची घटना शनिवारी 8 रोजी घडली होती. या प्रकरणी सोयगाव पोलीस स्टेशनला येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे शहराध्यक्ष गणेश पगारे यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध रात्री उशिरा भारतीय दंड विधान 295 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात परिस्थिती तणाव पूर्ण व पोलिसांच्या नियंत्रणात आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विटबने प्रकरणी बुधवारी 12 जुलै रोजी सोयगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौक येथे आंबेडकर अनुयायांनी बुद्ध वंदना घेऊन डॉ.आंबेडकर चौकातुन मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात गलवाडा, फर्दापुर, शेन्दुर्णी, रमाबाई कॉलनी, डॉ. आंबेडकर नगर, आमखेडा, काले नगर, नारलीबाग महिला पुरुषासह तरुणांचा मोठा सहभाग होता. मोर्चा घोषणाबाजी करीत शिस्तित वाल्मीकपुरा, नारलीबाग, मार्गे छत्रपति शिवाजी चौक एस.टी.बसस्थानक येथे आल्यावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

सखोल तपासाची मागणी
यावेळी प्रमुख वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विटंबनेचा निषेध व्यक्त करीत पोलिसांनी या घटनेस जबाबदार असणार्‍या आरोपींना तातडीने अटक करावी तसेच घटनेचा सखोल तपास करुन मुळापर्यंत जाऊन कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी सोयगाव तहसील प्रशासनाला सामूहिक निवेदन देण्यात आले. निवेदन नायब तहसीलदार विठ्ठल जाधव यांनी स्विकारले. बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार व शांतताभंग होऊ नये यासाठी सपोनि सुजीत बडे, पोउनि गणेश जागडे व पोलिस कर्मचार्‍यांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.