न्याय मिळाला; पुढे काय?

0

कोपर्डीसारख्या एका छोट्या खेड्याचे नाव ज्या नृशंस आणि दुर्देवी घटनेमुळे राज्यभर गाजले, त्या कोपर्डी बलात्कार व हत्याकांडाचा अंतिम निकाल अखेर लागला. नगरच्या विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी तीनही नरपशुंना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. ‘मातृवत परदारेषु, परद्रव्येषु लोष्ठवत’ ही आपली संस्कृती आहे. परस्त्रीकडे मातेप्रमाणे बघा आणि परद्रव्याला मातीचे ढेकूळ समजा, असा या संस्कृत उक्तीचा अर्थ होतो. कोपर्डीतील नरधमांनी जे घृणास्पद कृत्य केले; तसे कृत्य करण्यास हिंस्त्रांत हिंस्त्र पशुही धजावला नसता. त्यामुळे समाजमनावर दीर्घकाळ परिणाम करणार्‍या आणि गुन्हेगारांवर वचक बसविणार्‍या या ऐतिहासिक निकालाबद्दल आम्ही न्यायाधीश केवले व आरोपींना फाशीपर्यंत पोहोचविणारे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांचे खास अभिनंदन करत आहोत. कोपर्डीच्या अभागी बालिकेला न्याय मिळाला आहे; परंतु राज्यात, देशात अशाच नरपशुंच्या वासनांना अन् विकृतीला बळी पडलेल्या मायबहिणींचे काय? अशा घटना रोखण्यासाठी माणसांतील पशुत्वच नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागणार आहेत.

बलात्काराचा गुन्हा गंभीर तर असतोच परंतु तो अत्याधिक क्रूर असून, स्त्री व समाजावर त्याचा खोलवर परिणाम होत असतो. जीवन जगण्याच्या संबंधित स्त्रीच्या मूलभूत अधिकारावरही गुन्हेगार घालाच घालत असतो. त्यातही कोपर्डीची घटना ही अमानवीय होती; खरे तर या घटनेची माहिती या अग्रलेखात नमूद करू नये; परंतु या घटनेतील विक्षिप्तपणा अत्यंत घृणास्पदच होता. नराधमांनी मुलीचे हात-पाय तोडले. ओठांचा चावून चोथा केला होता. केस उपटले होते. तिला प्रचंड वेदना दिल्या होत्या. जणू काही ती एखादी निर्जिव वस्तू आहे, असे हे नराधम वागले होते. त्यानंतर पाशवी बलात्कार केला, तिची निर्घृण हत्या करूनच ते थांबले नाहीत; तिच्या मृतदेहाचीही त्यांनी विटंबणा केली. मुलगी मेली तरी या नराधमांतील राक्षस शांत झालेला नव्हता. या घटनेत हे नरपशु ज्या पद्धतीने वागले तो प्रकार पाहाता, ही माणसे समाजात जीवंत ठेवण्याच्या लायकीची नव्हतीच, हे स्पष्ट होते. कोपर्डीची घटना समाजातील प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकविणारी होती. लेकीबाळीच्या भवितव्याची चिंता वाढविणारी होती. म्हणूनच महाराष्ट्र हादरून गेला होता. राज्यात लाखोंच्या संख्येने निघालेल्या मराठा मोर्चांनी या घटनेकडे सर्वांचे लक्ष वेधले; मराठे रस्त्यावर उतरले नसते तर कदाचित खर्डा येथील हत्याकांडासारखे कोपर्डीचे मारेकरीही निर्दोष सुटले असते; अशी सार्थ भीती आम्हाला वाटते आहे. अ‍ॅड. उज्वल निकम यांनी या खटल्यात आपली बुद्धिमत्ता पणाला लावली, आरोपींना फासापर्यंत नेण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न, युक्तिवाद आणि भरभक्कम पुरावे उभे करण्यासाठी मेहनत घेतली, त्याला खरेच तोड नाही. अ‍ॅड. निकम हे भारतीय लोकशाहीमधील अत्यंत महत्वाचे व्यक्तिमत्व ठरले आहे; ते त्यांच्या अंगभूत गुणांमुळे. वकील म्हणजे न्यायप्रणालीचा चेहरा असतो. त्यामुळे या खटल्यात सरकारी वकील म्हणून त्यांनी जे मोलाचे कार्य केले त्याबद्दल हे जनमाणस त्यांचे चिरंतन ऋणीच राहील. वकिलीतील त्यांच्या हातखंड्यामुळे आजपर्यंत त्यांनी 628 गुन्हेगारांना जन्मठेप तर 37 गुन्हेगारांना फाशीपर्यंत पोहोचविले आहे. कोपर्डीच्या पीडितेलाही आज जो न्याय मिळाला तो केवळ अन् केवळ अ‍ॅड. निकम यांच्या प्रयत्नामुळेच ही बाब सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आणि सत्य आहे. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी करावे लागणारे परिश्रम, मिळणार्‍या धमक्या सहन करून मोठ्या ध्यैर्याने न्यायालयापुढे उभे रहावे लागते. म्हणूनच एखाद्या पीडितेला न्याय मिळू शकतो.

तपास यंत्रणा एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना चुकू शकते. पुरावे व वस्तुस्थिती यांची मांडणी करताना चुका होऊ शकतात. परंतु, या चुका गुन्हेगारांच्या पथ्यावर पडत असतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे, खर्डा (ता. जामखेड) येथील गाजलेल्या नितीन आगे हत्याकांडाचे देता येईल. या नृशंस हत्याकांडातील नऊही आरोपींची नगरच्याच जिल्हा व सत्र न्यायालयातून अगदी निर्दोष मुक्तता झाली आहे. सवर्ण मुलीशी असलेल्या प्रेमप्रकरणातून हे हत्याकांड घडविले गेले होते. कोपर्डीच्या प्रकरणात जशा मराठा संघटना रस्त्यावर उतरल्यात, तशाच या हत्याकांडात दलित संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. परंतु, गुन्ह्याचा तपास, सबळ पुराव्यांची मांडणी आणि अ‍ॅड. निकम यांच्यासारख्या वकिलाची खटला मांडताना असलेली उणिव यामुळे या हत्याकांडातील आरोपी खून पचवू शकले आहेत. त्यामुळे कोपर्डीच्या पीडितेला अ‍ॅड. निकम यांनीच न्याय मिळवून दिला, त्याबद्दल आम्ही सर्व मायबहिणींच्यावतीने त्यांचे खरोखर अभिनंदन करतो. न्यायसंस्थेच्या निकालामुळे पीडितेचा जीव काही परत येणार नाही. आरोपी अजून सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रपतीपर्यंत दयेची भीक मागणारच आहेत. त्यामुळे तीनही नराधमांना जेव्हा प्रत्यक्षात फासावर लटकविले जाईल तेव्हाच न्याय पूर्ण झाला असे समजता येईल. अशा शिक्षेमुळे गुन्हेगारांवर जरब निर्माण होऊन यापुढे अशा घटनांना पायबंद बसेल, अशी अपेक्षा मात्र ठेवू या.

राज्यातील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. ही सुरक्षा अधिकाधिक सक्षम करण्यासाठी राज्याचे प्रलंबित महिला सुरक्षा धोरण आता तरी देवेंद्र फडणवीस सरकारने तातडीने जाहीर करावे व त्याची अमलबजावणी करावी. या निकालाने गुन्हेगारांना इशारा मिळाला असून, प्रत्येकाचा न्यायसंस्थेवरील विश्वास वाढला आहे. गुन्हेगारांना फासावर चढवून असे गुन्हे रोखता येतील, असे वाटणे सहाजिक असले तरी, अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची खात्री देता येणे अशक्य आहे. तेव्हा समाजाला कलंकभूत असणार्‍या गुन्ह्यांकडे बघताना ते गुन्हे समाजात घडूच नयेत, असे वातावरण या राज्यात निर्माण करता येईल का? याचा विचार राज्य सरकार आणि सर्वांनीच करणे आवश्यक आहे. आजकाल समाजात वाढलेली संस्कारहिनता हीच खरे तर या गुन्ह्यांना कारणीभूत ठरणारी बाब आहे. मनुष्य आणि पशु यांच्यात तसा काहीच फरक नाही.

‘आहारनिद्राभयमैथुनंच समानमेतत पशुभिर्नराणाम’ आहार, निंद्रा, भय आणि मैथुन ही प्रकृती पशु आणि मानवामध्ये समानच असते. परंतु, पशुंचे एक चांगले असते, ते प्रकृतीनेच वागतात. माणसांचे तसे नाही. त्यांच्यात कोपर्डीकांडासारखी विकृती शिरते. ही विकृती दूर करायची असेल तर अशा नरपशुंना केवळ फासावर लटकावून चालणारे नाही. तसे करत बसलो तर कित्येकांना फासावर लटकावूनही ही विकृती संपणार नाही. त्यासाठी संस्कार देण्याचीच खरी गरज आहे. माणूस अशा विकृतीकडे जाऊ नये, उलट प्रकृतीच्याही वर उठून त्याचे संस्कृतीसंपन्न व्हावे, यासाठी त्याला उच्चदर्जाचे शिक्षण व संस्कार देण्यासाठी समाजमन आणि सरकारने निश्चित प्रयत्न करावेत. कोपर्डीकांडातील तीनही आरोपी प्रौढ आहेत, त्यांनी जाणिवपूर्वक हे घृणास्पद कृत्य केले. त्यांना कमी शिक्षा दिली तर ते पुन्हा असे कृत्य करणार नाही, याची खात्री नाही. त्यामुळे न्यायालयाने तीनही आरोपींना फाशीच द्यावी, अशी मागणी अ‍ॅड. निकम यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी केलेला जबरदस्त युक्तिवाद न्यायसंस्थेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविला जाईल. शिक्षा एक दिवस काय आणि हजार दिवस काय, शिक्षा ही शिक्षाच असते, असे म्हणणारा या नृशंसकांडातील नराधम जितेंद्र शिंदे आता फासावर लटकविला जाईल तो दिवस त्याला शिक्षा काय असते त्याची पुरेपूर जाणिव करून देणारा असेल, असे समजू या. या तीनही नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर दुर्देवी मुलीच्या आईने न्यायदरबारात फोडलेला हंबरडा समाजाचे काळीज चिरणारा होता. हे हंबरडे भविष्यात थांबवायचे असेल तर समाजमन सुसंस्कृत करावे लागेल, तद्वतच गुन्हेगारांना कायद्याचा धाक वाटेल, अशी परिस्थिती या राज्यात अन् देशात निर्माण करावी लागणार आहे!