नवी दिल्ली : न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका असलेले कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. एस. कर्णन यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्याचबरोबर त्यांना 31 मार्चपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विदयमान न्यायमूर्तींविरोधात वॉरंट बजावण्याची ही इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
न्या कर्णन यांनी देशातील वीस विदयमान न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. या प्रकरणी चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी पंतप्रधानांकडे पत्र पाठवून केली होती. त्यांच्या या आरोपांमुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना यापूर्वी नोटीसही दिली होती. मात्र कर्णन आपल्या आरोपांवर ठाम राहिले. आपण पाठविलेल्या पत्रानंतर संबंधित न्यायमूर्तींवर काय कारवाई झाली अशी विचारणही त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केली होती. न्या. कर्णन यांना 10 मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ते हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात 10 हजार रूपयांचे जामीनपात्र वॉरंट बजावले आहे.