न्या. लोया मृत्यूकांडाची ‘एसआयटी’च चौकशी हवी!

0

सर्वोच्च न्यायालयाच्या निगरानीखाली एसआयटी नेमण्यासाठी याचिका

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात 15 प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शुक्रवारी राष्ट्रपती भवनात धडक देऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली, व सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यूकांडाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निगरानीखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात यावे, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. या मागणीसंदर्भात तब्बल 114 खासदारांच्या सह्यांची एक याचिकाच या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींकडे दाखल केली असून, या एसआयटीमध्ये सीबीआय अथवा एनआयए या तपास यंत्रणांचा समावेश करू नये, या यंत्रणा कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत, ते दिसत आहेत, अशी तक्राही राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे. या भेटीबाबत खा. राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. आम्ही राष्ट्रपतींची भेट घेतली असून, त्यांना लोयाप्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी केली आहे. तसेच, देशातील परिस्थितीबाबतही आम्ही राष्ट्रपतींना अवगत केले असल्याचे खा. गांधी म्हणाले. विशेष बाब म्हणजे, न्या. लोयाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात एसआयटी चौकशी नेमण्याच्या मागणीवर सुनावणीदेखील सुरु आहे.

मृत्यूचे तथ्य लोकांसमोर येऊ द्या : खा. गांधी
खा. राहुल गांधी म्हणाले, न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू नेमका कसा झाला, हे जाणणे गरजेचे असून, याप्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी व्हायला हवी, असे विरोधी पक्षांच्या खासदारांचे म्हणणे आहे. तसेच, या एसआयटीवर सर्वोच्च न्यायालयाची देखरेख असावी आणि त्यात सीबीआय किंवा एनआयएचा प्रतिनिधी असू नये, अशी मागणी आम्ही राष्ट्रपतींकडे केली आहे. खा. राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळवित काँग्रेस नेते कपिल सिब्बल म्हणाले, की जर टूजी प्रकरणात तर एसआयटी नेमली जाऊ शकते तर न्यायमूर्ती लोया मृत्यूकांडाची चौकशी करण्यासाठीही एसआयटी नेमण्यास काहीच हरकत नसावी. जेणे करून न्या. लोया यांच्या मृत्यूचे नेमके तथ्य सामोरे येऊ शकेल. तथापि, या तपास पथकात सीबीआय किंवा एनआयएच्या अधिकार्‍यांचा समावेश नसावा, अशी आमची मागणी आहे, असेही सिब्बल यांनी सांगितले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असल्याबाबत सांगितले असता, सिब्बल म्हणाले, की सुनावणी सुरु असली तरी, सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाचा तपास करत नाही. आम्ही तथ्य जाणून घेण्यासाठी स्वतंत्र तपास होण्याची मागणी करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी सुरु!
विशेष सीबीआय न्यायमूर्ती लोया हे भाजप अध्यक्ष अमित शहा हे आरोपी असलेल्या सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी घेत होते. नोव्हेंबर 2014 मध्ये त्यांचा नागपूर येथे अचानक मृत्यू झाला होता. ते सहकारी न्यायाधीशांच्या मुलीच्या लग्नकामी नागपूरला गेले होते. तथापि, त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला असल्याचे सांगण्यात आले असले तरी, राजकीय पक्षांसह काँग्रेसने या मृत्यूबाबत संशय व्यक्त केलेला आहे. लोया यांच्यानंतर आलेल्या न्यायमूर्तीने या खटल्यात शहा यांना निर्दोष सोडले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात न्या. लोया मृत्यूकांडप्रकरणी स्वतंत्र याचिका दाखल असून, त्यावर सरन्यायाधीश दीपक मिश्रा सुनावणी घेत आहेत. पुढील सुनावणी 12 फेब्रुवारीला होणार आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे सरन्यायाधीशांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. सरन्यायाधीशांनी महाराष्ट्र सरकारकडून शवपरीक्षण अहवाल मागविला असून, सर्व कागदपत्रेही मागवून घेतली आहेत. न्या. लोया यांच्या बहिणीनेदेखील या मृत्यूबद्दल शंका उपस्थित केली आहे.