न्या. लोया मृत्यूप्रकरण सरन्यायाधीशांकडे!

0

2014 मध्ये नागपुरात झाला होता संशयास्पद मृत्यू

नवी दिल्ली : बहुचर्चित न्यायमूर्ती बी. एच. लोया मृत्यूप्रकरणाच्या ज्या केससंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी न्यायालयाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली, ती केस आता स्वत: सरन्यायाधीश दीपक मिश्रा हाती घेणार आहेत. हे प्रकरण न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाकडे होते. पण न्यायमूर्तींच्या तक्रारीनंतर अरुण मिश्रा यांनी स्वत:ला या प्रकरणातून बाजूला केले. त्यानंतर हे प्रकरण कोणाकडे वर्ग होणार याबाबत खूप तर्कवितर्क लढवले जात होते. आता या प्रकरणी सरन्यायाधीशांच्या खंडपीठात न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड असणार आहेत. एएनआय वृत्तसंस्थेने सुप्रीम कोर्टाच्या कॉजलिस्टच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर 22 जानेवारीरोजी या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

न्यायपीठात न्या. खानविलकर, न्या. चंद्रचूड
गुजरातमधील सोहराबुद्दीन खून खटल्याच्या सुनावणीसाठी नियुक्त करण्यात आलेले सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती ब्रीजगोपाल लोया यांचा डिसेंबर 2014 मध्ये संयास्पद मृत्यू झाला होता. लोया मृत्यूप्रकरणाच्या चौकशीची मागणी करणारी एक याचिका काँग्रेसनेते तहसीन पुनावाला आणि दुसरी पत्रकार बंधुराज लोणे यांनी दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत बंड पुकारले होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही या चारही न्यायमूर्तींनी न्या. लोया प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी केली होती. आता या सगळ्या प्रकरणानंतर लोया मृत्यूप्रकरणी दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली असलेले खंडपीठच सुनावणी करणार आहे.

न्या. लोया मृत्यूप्रकरण…
1 डिसेंबर 2014 रोजी नागपुरात त्यांचा मृत्यू झाला होता. लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला अशी प्राथमिक माहिती पुढे आली. न्या. लोया हे त्यावेळी सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणाची सुनावणी करत होते. या प्रकरणात पोलिस अधिकार्‍यांसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचीही नावे समोर आली आहेत. या केसबाबत न्या. लोया यांच्यावर बराच दबाव होता, अशी माहिती त्यांच्या कुटुंबाने दिली होती.