न्या. लोया मृत्यूप्रकरण : सर्व खटले सर्वोच्च न्यायालयात चालणार

0

2 फेब्रुवारीला सुनावणी

नवी दिल्ली : सीबीआयचे विशेष न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हणत सर्व कागदपत्रांची तपासणी करण्याची गरज व्यक्त केली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने सांगितले की, सर्व पक्षकार त्यांच्याकडील पुरावे सीलबंद करून न्यायालयाकडे सुपुर्द करतील. तसेच मुंबई उच्च न्यायालयातील खटल्यांसह सर्व खटले सर्वोच्च न्यायालयात एकत्रित चालतील. पुढील सुनावणी 2 फेब्रुवारीरोजी होईल.

आम्ही वर्तमानपत्र पाहणार नाही…
न्या. लोया मृत्यूप्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड म्हणाले की, हे प्रकरण खुपच गंभीर आहे. याप्रकरणाची सर्व कागदपत्रे आम्हाला तपासावी लागलीत. यासाठी सर्व महत्वाचे दस्ताऐवज न्यायालयाकडे द्यावेत. एका न्यायाधीशांचा संशयास्पद मृत्यू झाला असून वर्तमानपत्रात त्याबद्दल अनेकदा संशय उपस्थित केला गेला आहे. अशावेळी वर्तमानपत्रात काय छापून आले ते आम्ही पाहणार नाही, तर कागदपत्र काय सांगतात ते पाहणार आहोत.

अ‍ॅड. जयसिंह यांनी मागितली माफी
याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अ‍ॅड. हरिश साळवे यांनी म्हटले होते की याप्रकरणाच्या सर्व गोष्टी मीडियात येऊ नयेत. यावर अ‍ॅड. इंदिरा जयसिंह यांनी म्हटले, सरन्यायाधीशांनी पद्मावत चित्रपटाबाबतही आदेश जारी केला आहे. अशाप्रकारे मीडियावर बंदी आणली जाऊ शकत नाही. यावर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले की, आतापर्यंत ते एक शब्दही बोलले नाहीत. आणि मीडियाबाबतही काही बोललेले नाहीत. हे चूकीचे असून इंदिरा जयसिंह यांनी बिनशर्त माफी मागावी. यानंतर जयसिंह यांनी न्यायालयाची माफी मागितली.

अ‍ॅड. दवे यांनी घेतले अमित शहांचे नाव
सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाच्या सुनावणीत म्हटले की, पक्षकरांनी एक दुसर्‍यांचे दस्तऐवजही आपसात पाहिले पाहिजेत. सुमारे एक तासभर चाललेल्या सुनावणीत अ‍ॅड. दुष्यंत दवे आणि अ‍ॅड. हरिश साळवे यांच्यात जोरदार खडजंगी झाली. अनेकदा अ‍ॅड. दवे यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे नाव घेतल्याने अ‍ॅड. हरिश साळवे यांनी त्यास अक्षेप घेतला. यावेळी न्यायाधीश चंद्रचूड यांनी अ‍ॅड. दवे यांना उद्देशून म्हटले की, आतापर्यंतच्या माहितीनुसार हा नैसर्गिक मृत्यू आहे, मग आपण वारंवार कुणाचे नाव का घेता? तत्पुर्वी, अ‍ॅड. दवे यांनी अ‍ॅड. साळवे हे अमित शहा यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिनदा ओरडून सांगितले होते.