मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती
मुंबई :- न्या.लोया मृत्यू प्रकरणात मृत्यू झाल्यानंतर तीन वर्षे कोणीही संशय व्यक्त केला नव्हता.एका नियतकालिकात लेख छापून आल्यानंतरच याची चर्चा सुरू झाली.हा लेखही धादांत खोटा आहे.न्या.लोया यांच्या मुलाने देखील पत्रकारपरिषद घेउन स्पष्ट केले आहे की लोयांच्या मृत्यूबददल त्याच्या मनात कोणताही संशय नाही काही लोक त्याचे राजकारण करत आहेत.लोया यांच्या मृत्यूचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे.निकालात दूध का दूध आणि पानी का पानी होणारच असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
विरोधी पक्षातर्फे नियम २९३ अन्वये आणलेल्या कायदा व सुव्यवस्थेवरील प्रस्तावाचे उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.न्या.लोया प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूचा युक्तीवाद संपला आहे.लवकरच याप्रकरणाचा निकाल अपेक्षित असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महणाले,एका लग्नाला उपस्थित राहण्यासाठी न्या.लोया नागपूरला गेले होते.ते रविभवन येथे राहिले.लग्नाला उपस्थित राहून रात्री ११ वाजता ते रविभवनला आले.रात्री अकरा ते साडेअकरा ते दूरध्वनीवरून पत्नीशी बोलले.नंतर सहका-यांसोबत गप्पा मारून झोपायला गेले.पहाटे चारवाजता त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांचे सहकारी जज हे त्यांना घेउन दंदे रूग्णालयात गेले.दंदे रूग्णालयही मोठे आहे.तिथून त्यांना मेडिट्रिनाला नेण्यात आले.तिथे पोहोचेपर्यंत त्यांच्या हृदयाचे ठोके कमी झाले होते.त्यांना सीपीआरही देण्यात आला.सकाळी सव्वा सहा वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले, असे मुख्यमंत्री म्हणाले.
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसह प्रमुख चार न्यायाधीश हे सातवाजता रूग्णालयात हजर होते.त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर तीन वर्षे कोणीही काहीही बोलले नाही.एका नियतकालिकात लेख छापून आल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली.मुळात हा लेखच पूर्णपणे खोटा आणि असत्य माहितीवर आधारित आहे.न्या.लोया यांच्या मुलानेही पत्रकारपरिषद घेउन कुटुंबियांच्या मनात कोणताही संशय नसल्याचे स्पष्ट केले आहे.लेखात ज्या डॉ.शर्मांचा संदर्भ देण्यात आला आहे त्यांनी देखील पत्र लिहून त्यांच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ छापून आल्याचे स्पष्ट केले आहे.सर्वोच्च न्यायालयात आता या प्रकरणाचा निकाल लागेलच त्यातूनच दूध का दूध आणि पानी का पानी होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.