मुंबई : विधिमंडळात प्रश्न दडपण्यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पैसे घेतल्याचा आरोप करणारे वृत्त प्रसारीत केल्याबद्दल ‘न्यूज 18 लोकमत’ या मराठी वृत्तवाहिनीवर विधानपरिषदेत राष्ट्रवादीतर्फे हेमंत टकले यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला. सभापती रामराजे निंबाळकर यांनी तो दाखल करून घेत विशेषाधिकर समितीने अधिवेशन संपण्यापूर्वी यावर निर्णय घ्यावा, असा आदेश दिला.
एचडीआयल या बांधकाम कंपनीसंबंधी लक्षवेधी विधिमंडळात येऊ नये, यासाठी पैशाची देवाणघेवाण करण्याबाबतची ध्वनिफित ‘न्यूज 18 लोकमत’ वृत्त वाहिनीवर दाखविण्यात आली होती. यात धनंजय मुंडे यांचा नावाचा उल्लेख आहे. या वृत्तावरून गुरुवारी विधानपरिषदेत प्रचंड गदारोळ झाला. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायर्मूर्तींमार्फत या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली होती.