पॅरिस – करोना विषाणूचा मोठा फटका बसलेल्या फ्रान्स आणि स्पेन या देशांनी मंगळवारी लॉकडाउन उठवण्याचा पथदर्शक आढावा सादर केला. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातही विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. न्यूझीलंडमध्ये मंगळवारी लॉकडाउन शिथिल केल्यानंतर बांधकाम क्षेत्र सुरू झाले. दुकाने गर्दीने फुलून गेली. मात्र सुरक्षित वावर, मास्कचे नियम सर्वांना लागू आहेत. यासह युरोप आणि अमेरिकेतील काही राज्यांनीही निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे.
ब्राझील कोरोनाचा नवा हॉटस्पॉट
काही देशांमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी होत असला तरी ब्राझील हा देश आता कोरोनाचा एक हॉटस्पॉट म्हणून पुढे येत आहे. रिओ दि जानेरो आणि इतर चार शहरांतील वैद्यकीय अधिकार्यांनी रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा कोसळण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले आहे. ब्राझीलमध्ये अनेक जण घरांमध्येच अंतिम घटका मोजत आहेत.