पिंपरी-चिंचवड : येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या वतीने नागपंचमी या सणाच्या निमित्ताने; मनुष्याने प्राण्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी आणि प्राणीमात्रांचे रक्षण करावे, या उद्देशाने बुधवारी पर्यावरणपूरक नाग बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत इयत्ता तिसरी आणि चौथी इयत्तेतील विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आकर्षक असे पर्यावरणपूरक नाग बनविले होते. चिमुकल्यांच्या कल्पकतेला शिक्षकांनी दाद दिली.
सापांविषयी प्रबोधन
नाग हा शेतकर्यांचा मित्र आहे. तसेच अन्न-धान्याची नासाडी करणार्या उंदरांना नष्ट करून नाग हा शेतकर्यांना मदत करतो. अशा या सापांबद्दल समाजात असलेल्या अंधश्रद्धा दूर करणे व पर्यावरणाला सापांचे महत्त्व बालमनावर ठसवणे, हा या मागचा हेतू असल्याचे यावेळी शिक्षकांकडून सांगण्यात आले. यावेळी चिंचवड शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नीळकंठ चिंचवडे आणि मुख्याध्यापिका योगिता बनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.