सव्वाचार लाखांची रोकड जप्त ; लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई
भुसावळ:- खाजगी कंपनीच्या वसुली अधिकार्याला चाकूचा धाक दाखवत तब्बल 12 लाखांची लूट करणार्या नवी दिल्लीतील आरोपींच्या मुसक्या रावेरसह चाळीसगावातून आवळण्यात लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाच्या यंत्रणेला यश आले आहे. आरोपींच्या ताब्यतून चार लाख 10 हजारांची रोकड जप्त करण्यात आली. 15 मार्च रोजी दुपारी 2.15 वाजता आरोपींनी न्यू दिल्लीतील रविदास मार्ग, गोविंदपूरी येथे लूट करून रेल्वेने पोबारा केला होता. आरोपींबाबत वायरलेसद्वारे यंत्रणेला माहिती कळवल्यानंतर सापळा रचून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
लूटनंतर रेल्वेने पळाले आरोपी
न्यू दिल्लीच्या राईटर सेफ गार्ड प्रा.लि.कंपनीत कामास असलेल्या विक्रम साहू रमेशंचद्र साहू (संगम विहार, साऊथ ईस्ट, न्यू दिल्ली) हे 15 मार्च रोजी दुपारी 2.15 वाजता सही इंटरप्राईजेस गोविंदपुरीच्या गल्ली क्रमांक तीनमधून दुचाकी (डीएल 3 एसडीआर 9637) ने सहकारी विक्रम एस.सोबत जात असताना संशयीत आरोपी 10 ते 12 लाख रुपये असलेली रोकड लांबवून पोबारा केला. या प्रकारानंतर न्यू दिल्लीच्या गोविंदपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
चाळीसगावसह रावेरातून आरोपींच्या आवळल्या मुसक्या
लूटीनंतर नागपूर लोहमार्ग व दिल्ली नियंत्रण कक्षाने आरोपी अप कृषीनगर एक्स्प्रेसने पसार होत असल्याची माहिती तसेच आरोपींचे छायाचित्र पाठवल्यानंतर भुसावळ विभागात तपासणी सुरू करण्यात आली. रविवारी पहाटे रावेर रेल्वे स्थानकावर संशयीतरीत्या फिरणार्या वासुदेव दलचंद घोष (55, जगन्नाथपूर, नाडिया, वेस्ट बंगाल) यास रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी प्रकाश पाटील यांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे एक लाख 29 हजार 460 रुपयांची रोकड आढळून आली. आरोपीस भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास चाळीसगाव लोहमार्ग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दिनेश पवार यांच्यासह एएसआय राजेसिंग गावीत, हवालदार ईश्वर बोंडे व बापू सोनवणे यांना बोगी क्रमांक- एस- 7मध्ये संशयीत आरोपी हरविंदरसिंग किशोरलाल ठाकूर (35, रा.संजय विहार, साऊथ, न्यू दिल्ली), राकेश कुमार कोळी (40, गोविंदपूरी, न्यू दिल्ली), दमवीर बेनीवाल (27, ओखला फेम, साऊथ, न्यू दिल्ली) आढळल्याने त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी न्यू दिल्लीत लूट केल्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून दोन लाख 81 हजार 170 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. दरम्यान, आरोपींचा ताबा घेण्यासाठी न्यू दिल्ली येथील पोलीस निघाल्याचे सूत्रांनी सांगितले. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक सतीश कुमार करीत आहेत.