न्यू होरायझोन शाळेविरोधात तक्रार दाखल

0

पनवेल : पनवेल, नवीन पनवेल शहरामधील शाळा या, ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. मात्र याचा त्रास पालक वर्ग तसेच विद्यार्थी वर्गाला सहन करावा लागत आहे. खांदा कॉलनी येथील न्यू होरायझोन शाळा एनएचपीएसच्या अभ्यासक्रमाची पुस्तके न देता खासगी प्रकाशन असलेली जास्त किमतीची पुस्तके लादत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या शाळेविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

खांदा वसाहतीतील न्यू होरायझन शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याचाच फायदा घेत शाळा प्रशासन विद्यार्थ्यांचे कपडे व पुस्तके बाहेरून विकत न घेता शाळेतून विकत घेण्याची सक्ती करत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. बाजारात शालेय गणवेशाची किमत दुप्पटीने कमी असताना शाळेत मात्र एकाच किमतीत हे गणवेश स्वीकारावे लागत असल्याचे पालकांनी सांगितले. त्याचा फटका पालकांना सहन करावा आहे. तसेच विद्यार्थ्यांना शालेय सहलीकरता घेऊन गेल्यानंतर त्यांची जबाबदारी शाळेची नसल्याचे शिक्षक सांगत असल्याची खंत पालकांनी यावेळी व्यक्त केली. गणवेशासोबत वही, पुस्तके, ग्राफपेपर आदीसाठी शाळा प्रशासन सक्ती करत असल्याचे पालक वर्गाचे म्हणणे आहे. ४ एप्रिल रोजी पालकांनी एकत्रित जमून न्यू होरायझन शाळेविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत मुकवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.