भुसावळ- शिर्डी येथून साई दर्शनानंतर गावाकडे परतलेल्या यावल तालुक्यातील न्हावीच्या साईभक्तांच्या वाहनाला येवला येथे अपघात झाल्याची घटना बुधवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास घडली. अत्यवस्थ अवस्थेतील तिघा तरुणांना भुसावळातील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे व जिल्हा परीषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांनी वेळीच मदतीचा हात देत खाजगी रुग्णालयात दाखल करीत माणुसकीचे दर्शन घडवले. यावल तालुक्यातील न्हावी येथील मुपेश भोळे, भूषण इंगळे, निलेश फिरके (सर्व रा.न्हावी, ता.यावल) हे 25 ते 30 वयोगटातील तीनही तरुण बुधवारी पहाटे साई दर्शनासाठी चारचाकी (एम.एच.19 बी.यु.0702) वाहनाद्वारे रवाना झाले होते. दर्शन आटोपल्यानंतर हे तरुण परतीच्या प्रवासात असताना येवला गावाजवळ भरधाव चारचाकी ट्रकसह अल्टो वाहनावर आदळल्याने तीनही तरुण अत्यवस्थ झाले तर मुपेश भोळे या तरुणाला अधिक मार लागून रक्तस्त्राव होवू लागल्याने घटनास्थळी मोठी गर्दी जमली तर पुण्याहून भुसावळकडे निघालेल्या सावकारे दाम्पत्यासमोरच झालेल्या अपघातानंतर त्यांनी जखमींना तातडीने वेळेची पर्वा न करता येवला शहरातील शहा अॅक्सीडेंट रुग्णालयात हलवून माणुसकीचे दर्शन घडवले तसेच न्हावी येथील कुटुंबियांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. दरम्यान, तिघाही जखमी तरुणांना अधिक उपचारार्थ नाशिक येथे हलवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.