भुसावळ- यावल तालुक्यातील न्हावी येथील विवाहिता करीना राहुल मोरे (19) हिने 19 जुलै रोजी कुर्हेपानाचे (ता.भुसावळ) येथील नणंदेच्या घरी आत्महत्या केली होती. पूर्व प्रियकराकडून सातत्याने होणारा त्रास व संबंध कायम ठेवावेत म्हणून सासरीदेखील तो फोन करीत असल्याने वैफल्यग्रस्त होवून तिने मृत्यूला कवटाळले होते. या प्रकरणी विवाहितेच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून पूर्व प्रियकरासह त्याच्या दोन साथीदाराविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लग्नानंतरही प्रेमसंबंध ठेवण्यासाठी मनस्ताप
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मयत विवाहिता करीनाचे संशयीत आरोपी अविनाश परमेश्वर तायडे (न्हावी, ता.यावल) याच्याशी प्रेमसंबंध होते मात्र त्याचे चाल-चलन व्यवस्थित नसल्याने करीनाचा विवाह इंदौर येथील राहुल मोरे नामक तरुणाशी करून देण्यात आला होता. विवाहानंतरही आरोपी अविनाश हा करीनाच्या सासरी दूरध्वनी करून प्रेमसंंबंधाची माहिती देत होता शिवाय करीनालाही प्रेमसंबंध ठेवण्यासाठी धमकावत होता. या सर्व प्रकारात त्याचे साथीदार विशाल मुरलीधर तायडे व सागर सुरेश तायडे (न्हावी, ता.फैजपूर) यांनी मदत करीत होते. आरोपीच्या छळाला कंटाळून करीना कुर्हेपानाचे येथे नणंदेच्या घरी आली असताना वरच्या मजल्यावर गळफास घेत मृत्यूला कवटाळले होते तर या बाबीस तीनही आरोपी जवाबदार असल्याने त्यांच्याविरुद्ध विवाहितेचे वडील कुंदन सुरेश तायडे (न्हावी, ता.यावल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक अरुण हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन खामगड करीत आहेत.