सदगुरू श्री नीळकंठदासजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महोत्सवाचे आयोजन ः 15 एकर जागेवर मंडप उभारणी
फैजपूर : जवळच असलेल्या न्हावी येथे मंगळवार, 24 डिसेंबरपासून सदगुरू श्री नीळकंठदासजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भव्य सदगुरू स्मृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून तो 30 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. देशभरातील संत-महंत उपस्थित राहणार आहेत. 15 एकर जागेवर मंडप टाकण्यात आला असून स्टेज, महाविष्णु यज्ञ मंडप व महिला प्रसादालय मंडपाचे उभारणी करण्यात आली असून स्वतंत्र स्वयंपाक कक्षही उभारण्यात आला आहे. एकाचवेळी तीन हजार भाविकांना प्रसाद घेता येणार आहे तर कथा श्रवणासाठी किमान 12 हजार भाविक बसू शकतील, असा प्रशस्त मंडप उभारण्यात आला आहे. यज्ञ मंडपात 125 जोडपे यज्ञास बसणार आहेत.
11 कुंडी महाविष्णू यज्ञ होणार
या महोत्सवात आतापर्यंत कुठेही न झालेला नाही असा 11 कुंडी महाविष्णु यज्ञ होणार आहे तसेच या कार्यक्रमात दररोज (सात) दिवस मेडिकल कॅम्प ठेवण्यात आला असून रक्तदान शिबिरही होणार आहे. या महोत्सवात विधवा महिलांचा सन्मान होईल तसेच पंचक्रोशीमधील साधू-संतांच्या मातांचा सन्मान होणार आहे तसेच स्वामिनारायण भगवंताचे प्रसादीभूत चरणारविंद आरसच्या कलात्मक छत्रीमध्ये स्थापना करण्यात येणार आहे. या महोत्सवात 5.25 कोटी मंत्रलेखन झालेल्या पोथ्या छत्रीखाली ठेवण्यात येणार आहेत व चार वेद, 18 पुराण, 11 उपनिषद, ज्ञानेश्वरी, वचनामृत, भक्तचिंतामणी, सत्संगी जीवन, शीक्षापत्री भाष्य म्हणजे (कुल 31 संहीता पाठी विद्वान संत व ब्राम्हण) करणार आहे. ब्रह्नाभोज (पारायण) होईल . या महोत्सवात यावल तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या परिवाराला आर्थिक सहाय व शहीद सैनिकांच्या परीवाराचा गौरव व सहायता करण्यात येणार आहे.
यांची राहणार महोत्सवात उपस्थिती
या महोत्सवाला अध्यक्ष धर्मप्रसाददासजी (वडताल), उपाध्यक्ष ज्ञानप्रकाशदासजी, उद्घाटक हरीप्रकाशदासजी (गांधीनगर), वडताल संस्थेचे
चेअरमन देवप्रकाशदासजी, स्वामी ज्ञानजीवनदासजी, स्वामी राघवानंदजी (दिल्ली), शास्त्री नौतमप्रकाशदासजी उपस्थित राहणार आहेत. सदगुरू स्मृती महोत्सवाचे आयोजन श्री स्वामिनारायण गुरुकुल संस्था, सावदातर्फे करण्यात आले असून लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या महोत्सवात वेदांत व्याकरणाचार्य स.गु.शा.श्रीभक्तिप्रकाशदासजी व अध्यक्ष स.गु.शा.श्रीधर्मप्रसाददासजी मार्गदर्शन करणार आहेत.