जळगाव : जय किसान आणि आमची माती आमची माणसंतर्फे भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त 27 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता कालिदास कलामंदिर, नाशिक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, कृषिरत्न पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण कर्तबगार शेतकर्यांचा गौरव ही यावेळी होईल. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी येथील जेष्ठ शेतकरी टेनू डोंगर बोरोले यांना कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्रातून श्री. बोरोले हे एकमेव शेतकरी आहेत. कार्यक्रमास विधानपरिषदेचे उपसभापती मााणिकराव ठाकरे, कृषिमंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, आंतरराष्ट्रीय कृषितज्ज्ञ डॉ. रमेश ठाकरे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, कुर्मी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ल.पी. पटेल, ब्रिगेडियर सुधीर सावंत, खासदार हेमंत गोडसे, माजी कृषी संचालक मंगेश देशमुख, डॉ. प्रभा कबाडे (कर्नाटक), उद्योजक एस.के. शेट्टी, मुंबई आकाशवाणीचे डॉ. संतोष जाधव, कृषी शास्त्रज्ञ जयराम पुरकर, सोलापूर विदयापिठाचे माजी कुलगुरू डॉ. यु.म. पठाण, अभिनेत्री अलका कुबल-अठल्ये यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी शेतकरी गौरव विशेषांकाचे प्रकाशनही होईल. प्रसिद्ध शाहीर उत्तमराव गायकर यांचाही कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष तुषार वाघुळदे हे करणार आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती ‘कृषी उत्सव’ म्हणून साजरी करण्यात येणार आहे. असे जय किसानच्यावतीने कळविण्यात आले आहे .