न्हावेखाडी शाळा नावारूपास आणणार

0

पनवेल । शहरापासून दूर मात्र कांदळवन आणि खाडीच्या निसर्गमय परिसरात असलेली न्हावेखाडी शाळा महाराष्ट्रातील नामवंत शाळा म्हणून नावारूपास आणण्याचा मानस माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या न्हावेखाडी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या आधुनिक पद्धतीच्या शौचालयाचे उदघाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले तसेच येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते. उद्योजक कान्हाशेठ ठाकूर व सहकार्‍यांच्या माध्यमातून हे शौचालय व युवकांच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.

यावेळी रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, न्हावेखाडी माझे जन्मगाव आहे. येथे सोयी-सुविधा उपलब्ध करीत असतानाच येथील शाळा दर्जेदार असली पाहिजे हा आपला मानस आहे. या शाळेत सद्यस्थितीत 35 विद्यार्थी असले तरी 350 विद्यार्थ्यांची सोय होईल, या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा असेलेली इमारत उभारत असून मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल, असे ठाकूर यांनी सांगितले.