न झालेल्या लुटीचा डाव पोलिसांनी उधळला : खडक्यात गोळीबारात अल्पवयीन जखमी

पोलिस उपअधीक्षकांच्या सतर्कतेने उघड झाला गुन्हा : पिस्टल हाताळताना सुटली गोळी

भुसावळ (गणेश वाघ) : पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या चाणाक्ष नजरेने खडक्यात झालेल्या गोळीबार प्रकरणाचा उलगडा झाला असून या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अल्पवयीन बालकालाही आरोपी करण्यात आले असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अल्पवयीन संशयीताकडून गावठी पिस्टल हाताळताना गोळी सुटल्याने तो जखमी झाल्याची घटना गुरूवारी रात्री घडली होती मात्र प्रकरण अंगाशी न येण्यासाठी संशयीतासह त्याच्या अन्य चौघा मित्रांनी पोलिसांना लूट झाल्याचा बनाव केला मात्र पोलिस उपअधीक्षकांच्या चाणाक्ष नजरेने आरोपींचा हा डाव उधळल्यानंतर मूळ गुन्ह्याची उकल करण्यात यंत्रणेला यश आले.

न झालेल्या लुटीचा डाव उघड
झाले असे की, खडका रोडवरील बुद्धविहाराजवळ 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीकडून आपल्याजवळील पिस्टल हाताळताना गोळी सुटून ती डाव्या मांडीला लागली मात्र ही बाब पोलिसांपर्यंत गेल्यास अडचण वाढणार असल्याचे लक्षात घेता अल्पवयीनाने आपले मित्र चेतन सपकाळे, पवन सपकाळे, सचिन सपकाळे व सुरज कोळी यांना हाताशी धरत खडका मिलजवळ आपल्याला लुटण्यात आल्याचा डाव रचला व रात्री उशिरा तालुका पोलिसांना तशी माहिती दिल्याने यंत्रणा कामाला लागली. पोलिस उपअधीक्षकांनी जखमीने सांगितलेल्या जागेचे स्पॉट व्हेरीफिकेशन केले शिवाय जखमी तरुणाला लागलेल्या गोळीच्या अनुषंगाने आपला अनुभव पणाला लावत हा प्रकार लुटीचा नसल्याचे पहाटे निष्पन्न केले. पोलिसांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी पाच संशयीतांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी अल्पवयीनावर उपचार सुरू असून अन्य चौघा सज्ञान आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी शुक्रवारी पत्रकार परीषदेत सांगितले.