सर्वसाधारण सभेत 50 विषयांना मंजुरी
शहादा:शहरातील नागरिकांचा नगर पालिकेतर्फे सामूहिक विमा काढण्यासह पन्नास विषयांना सर्वानुमते सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली. येथील पालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी, 24 रोजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. सभेला उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका व विभाग प्रमुख उपस्थित होते. सभेत पन्नास विषयांवर चर्चा करण्यात आली.
नगरसेवकांच्या पत्रावर विचार विनिमय
सभेत नगरपालिका हद्दीतील सर्वसामान्य नागरिकांचा नगरपालिकेतर्फे सामूहिक विमा काढणे, न.पा.क्षेत्रातील आदिवासी व दलित वस्ती प्रभागात सौर उर्जेवर कार्यरत स्नानगृहे बांधणे, न.पा. हद्दीत विविध रस्त्यांची डागडुजी करणे, मुरुम पुरविणे, गटार दुरुस्ती आदी कामांकरिता वार्षिक दर मागविणे, सद्यस्थितीत कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादूर्भाव झालेला असून त्याच्या प्रतिबंधासाठी पालिका स्तरावर औषधी, जंतुनाशक, पीपीई किट्स व अनुषंगिक साधन सामुग्री उपलब्ध करणे तसेच कार्यवाही करणे, शहरामध्ये विविध ठिकाणी शौचालय व मुतारी बांधणे, न.पा.मालकीचे महात्मा गांधी पार्कचे देखभाल दुरुस्तीच्या ठेक्यास मुदतवाढ देणे यासह नगरसेवकांच्या पत्रावर विचार विनिमय करुन विषयांना मंजूरी देण्यात आली.
सफाई कामगारांच्या वारसांना सेवेत सामावून घेतांना आर्थिक व्यवहार होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सुचना गटनेते प्रा.मकरंद पाटील यांनी सभागृहात मांडली. तसेच विषय क्रमांक 31 अतिक्रमण मोहिमेकरीता झालेल्या खर्चास मान्यता देणे व विषय क्रमांक 33 म.गांधी पार्क देखभाल दुरुस्ती ठेक्यास मुदतवाढ देणे विषयाबाबत नगरसेविका विद्या जमदाडे यांनी हरकतीचे पत्र सभागृहात दिले. दरम्यान, कोरोना संसर्ग काळात पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी चांगले कार्य करीत साखळी तोडण्यात यश मिळाल्याने पालिकेच्यावतीने गटनेते प्रा.मकरंद पाटील यांनी मुख्याधिकारी राहुल वाघ यांचा गौरव केला.