सांगली: सरकार पिणार्यांकडून जो टॅक्स वसूल करायला पाहिजे, तो न पिणार्यांकडून घेत आहे, याची सरकारला लाज का वाटत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्यसरकावर घणाघाती हल्ला केला. ना लाज वाटत नाही का, अशा शब्दांत पेट्रोल दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
विरोधकांची संघर्षयात्रा बुधवारी सांगलीत दाखल झाली. त्यावेळी या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे महामार्गापासून 500 मीटर अंतरावरील दारूची दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे त्यापासून मिळणारा महसूल बुडाला. दारूबंदीमुळे बुडालेल्या महसुलाची तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारने पेट्रोलवर 3 रुपये अधिभार लावला आहे. त्यामुळे पेट्रोल दरात महाराष्ट्र देशात सर्वात महागडे राज्य आहे. यावर पवार यांनी सरकारवर अत्यंत कडक शब्दांत टीका केली. नीती आयोगाचे सदस्य शेतकरीविरोधी बोलतात यामागे बोलवता धनी कोण? कर्जमाफी आणि वीज दरवाढीबाबत विशेष अधिवेशन घ्या, अशीही मागणी अजित पवारांनी केली. शेतकर्यांना नाममात्र दरात वीज मिळायला हवी. आमच्या काळातील घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्र विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याचा दावा अजित पवारांनी केला. उसाबाबतीत सरकार उदासीन आहे. यामुळे साखर कारखाने, शेतकरी अडचणीत आहेत. सधन भागातील शेतकरीही अडचणीत आहे. शेतकर्यांना कर्जमुक्ती द्या, नाहीतर राज्याला तुमच्यापासून मुक्त करा, असेही अजित पवार म्हणाले.
5 हजार दराने तूर खरेदी करा
कोणतेही आढेवेढे न घेता सगळी तूर खरेदी केलीच पाहिजे. शेतकरी अडचणीत असताना तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. तूर प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी इच्छाशक्ती दाखवायला हवी. कोणत्याच प्रश्नावर भाजप गंभीर नाही. 22 एप्रिलपर्यंतचीच तूर का खरेदी केली जाते? सर्वच तूर 5 हजार 50 रुपये प्रती क्िंवटल दराने खरेदी करा, अशी मागणी अजित पवारांनी केली. सरकारने ऐकले नाही, तर प्रसंगी टोकाची भूमिका घेऊ, असा इशारा अजित पवारांनी दिला.