बीड : महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना यंदाही भगवानगडावर दसरा मेळाव्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. 30 सप्टेंबरला होणार्या या मेळाव्यात पंकजांना गडावर येण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत. महंत नामदेवशास्त्री यांनी गडाचा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर होऊ द्यायला तीव्र विरोध केला असून, त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पंकजा मुंडेंना परवानगी नाकारली आहे.
गडाचा राजकीय वापर नको : नामदेवशास्त्री
गेल्यावर्षी भगवानगडाच्या दसरा मेळाव्यावरून पंकजा मुंडे आणि महंत नामदेवशास्त्री यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यातला वाद विकोपाला गेला होता. या ऑडिओ क्लिपमध्ये नामदेव शास्त्रींना धमकी दिली होती. दसरा मेळाव्यानंतर नामदेवशास्त्रींना काय करायचे आपण भविष्यात पाहून घेऊ, असे व्हायरल होणार्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये पंकजा मुंडे म्हणत असल्याचे ऐकू येत होते. गडाच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंना भाषण करू द्यायला नामदेव शास्त्रींनी विरोध केला असून, गडाचा पंकजा असो की धनजंय मुंडे यापैकी कुणालाही राजकीय वापर करता येणार नाही, अशी भूमिका महंतांनी घेतली आहे. या संदर्भात कालच नगर पोलिसांनी नामदेव शास्त्रांची भेट घेऊन कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा केली होती.